Tue, Jul 23, 2019 07:16होमपेज › Pune › निगडीतून दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता

निगडीतून दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 12:48AMपिंपरी : प्रतिनिधी

वही आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रिया रामदास खंदारे (वय, 15) सपना रामदास खंदारे (वय 17, दोघी रा. मोरेवस्ती, चिखली)  या दोघी बहिणी बेपत्ता झाल्या आहेत. या प्रकरणी त्यांचा भाऊ प्रवीण रामदास खंदारे (वय 26) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिया आणि सपना दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. सध्या त्यांनी घराजवळच मेहंदी शिकण्यासाठी क्लास लावला आहे. 1 जुलै रोजी सायंकाळी वही आणण्यासाठी आईकडून पन्नास रुपये घेऊन त्या दोघी घराबाहेर पडल्या आहेत. नुकतेच ओटा स्कीम येथून  दोन मुली बेपत्ता झाल्या होत्या. मात्र पोलिस तपासात त्या सोलापूर येथील नातेवाईकाकांकडे मिळून आल्या आहेत. प्रिया आणि सपनासाठी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. निगडी पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

घरात घुसून तरुणीचा विनयभंग 

तरुणीच्या घरात घुसून तिची ओढणी ओढण्याचा प्रयत्न करीत तिचा विनयभंग केला. ही घटना निगडी येथे 30 जून रोजी घडली.  या प्रकरणी पीडित तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून राहुल गणेश स्वामी (28,रा. इंदिरानगर, ओटा स्कीम, निगडी) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल स्वामी सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित तरुणीच्या घरात घुसला. ती एकटी असल्याचे पाहून तिची ओढणी ओढण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्याने राहुल स्वामी पळून गेला. तरुणीने झाला प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.  

जाब विचारणार्‍या महिलेचा विनयभंग 

मामीला शिव्या देणार्‍यास जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) निगडी येथील दळवीनगरमध्येे घडली. या प्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सचिन घोडके याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेची मामी आणि घोडके यांची भांडणे झाली होती. घोडकेने मामीला शिव्या दिल्याने पीडित महिला त्याच्याकडे जाब विचारण्यासाठी गेली होती. घोडकेने पीडित महिलेच्या अंगावर हात टाकून तिचा विनयभंग केला. पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

बँकेतून बोलतोय सांगून 60 हजारांचा गंडा

बँकेतून बोलतोय असे सांगून 60 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी थेरगाव  येथील प्रीती राठोड (34, रा. शिवकॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राठोड यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यांना ‘मी बँकेतून बोलतोय तुमच्या क्रेडिट कार्डचा पिन जनरेट करायचा आहे’ असे सांगून ओटीपी मागितला. राठोड यांनी ओटीपी दिल्यानंतर त्यांच्या दोन बँकेच्या खात्यातून एकूण 60 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.