Sun, Jul 12, 2020 22:45होमपेज › Pune › बारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक

बारामतीत खळबळ; उद्योजकाच्या खुनाचा कट, दोघांना अटक

Published On: Jul 22 2019 2:26PM | Last Updated: Jul 22 2019 7:39PM
बारामती : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील बडे उद्योजक संग्राम तानाजीराव सोरटे (रा. मगरवाडी, ता. बारामती) व त्यांचा मावसभाऊ अ‍ॅड. प्रसाद भगवानराव खारतुडे (रा. अशोकनगर, बारामती) यांची रेकी करत कट करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेने बारामतीत खळबळ उडाली आहे. जयचंद संतोष जाधव (वय 20, रा. सोमेश्वरनगर) व सचिन कल्याण सोरटे (वय 40, रा. मगरवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. व्यावसायिक भागिदारीतील मतभेद व भावकीतील जुन्या भांडणाच्या कारणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणामुळे सोमवारी बारामतीत मोठी खळबळ माजली आहे. संग्राम सोरटे हे मगरवाडीतील नवनाथ उद्योग समुहाचे प्रमुख आहेत. व्यावसायिक भागीदारीतील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. याबाबत सोरटे यांनीच शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी जयचंद जाधव याला अटक केल्यानंतर त्याने सचिन सोरटे याचे नाव सांगितल्यावर त्यालाही अटक करण्यात आली आहे. 

संग्राम सोरटे यांनी भागीदारात सुरू असलेल्या वादाच्या या प्रकरणात पुढाकार घेत अ‍ॅड.प्रसाद खारतुडे यांच्या कार्यालयात तडजोडीचा प्रयत्न केला होता. परंतु तो असफल ठरला. संग्राम यांचे मावसभाऊ अ‍ॅड. प्रसाद खारतुडे हे यातील एकाचे वकील आहेत. दि. 17 जुलै रोजी अ‍ॅड. प्रसाद खारतुडे यांना यासंबंधीचा सुगावा लागला. दोघा आरोपींनी संग्राम यांना रिव्हॉल्व्हरने, तर प्रसाद यांना कोयता व तलवारीने मारण्याचा कट रचला होता. खारतुडे हे मेडद येथील शेतात गेले असता त्यांचा पाठलाग करण्यात आला होता. संग्राम सोरटे यांची मगरवाडीतील बंगला, नवनाथ मिल्कचे कार्यालय, करंजेपूल येथील नवनाथ पतसंस्थेचे कार्यालय या ठिकाणी आरोपींनी रेकीही केली होती. त्यावेळी रिव्हॉल्वरसह कोयते, तलवारीजवळ बाळगल्या होत्या. या घटनेचा सुगावा लागताच सोरटे व खारतुडे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेतली. त्यांनी अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. मीना यांनी बारामती गुन्हे शाखेला ही जबाबदारी दिल्यावर त्यांनी लागलीच हालचाल करत जयचंद याला ताब्यात घेतल्यावर या कटाचा उलगडा झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक चंद्रशेखऱ यादव, हवालदार संदीप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वप्निल अहिवळे, संदीप कारंडे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार, रॉकी देवकाते यांनी मोलाची कामगिरी बजावत लागलीच हालचाली केल्याने कट उधळून लावण्यात यश आले.

पोलिसांनी दोघा आऱोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, कट रचणे तसेच आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सतीश आस्वर अधिक तपास करत आहेत.

कामगाराच्या मुलाचाच सहभाग

पोलिसांनी अटक केलेल्या जयचंद जाधव याचे वडील संतोष जाधव हे अनेक वर्षे सोरटे यांच्या मोटारीवर चालक म्हणून काम करत होते. त्यामुळे जयचंद याला सोरटे यांच्यासंबंधीची खडान्खडा माहिती होती. त्यामुळे ते त्यांच्यावर पाळत ठेवून होते. शहरातील माळावरची देवी येथे त्यांनी कट रचला होता. दोघांचा काटा काढण्यासाठी दहा लाखांचा व्यवहार ठरला होता.

बार असोसिएशनतर्फे काम बंद आंदोलन

अ‍ॅड. प्रसाद खारतुडे यांचा कट रचून खून करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (दि. 22) बारामती बार असोसिएशनने दिवसभर काम बंद आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदविला. अशा पद्धतीने वकिलाची सुपारी दिली जात असेल तर यापुढे वकिलपत्र स्वीकारायचे कसे, असा सवाल यावेळी करण्यात आला. बारचे अध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानदेव रासकर, विजयसिंह मोरे, सचिन वाघ, सुनील वसेकर, धैर्यशील जगताप, नवनाथ भोसले यांच्यासह बारचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी यामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी, बार असोसिएशनतर्फे करण्यात आली.

आरोपींना चार दिवसांची कोठडी

दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा आरोपींना अटक करत बारामती न्यायालयापुढे हजर करण्यात आले. दि. 26 पर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी सतीश आस्वर यांनी दिली.