Sun, Jul 21, 2019 06:20होमपेज › Pune › पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दोघांचा मृत्यू 

पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दोघांचा मृत्यू 

Published On: Aug 30 2018 9:27PM | Last Updated: Aug 30 2018 9:27PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचा विळखा वाढत आहे. यामुळे पॉझिटीव्ह रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीत देखील वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी (दि.३०) स्वाईन फ्लूने आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, नवीन पाच पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

चिखली येथील ४८ वर्षीय महिलेचा आज स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. संबंधित महिलेस २७ ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. २९ ऑगस्ट रोजी तिला स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. तर निगडी येथील १४ वर्षीय मुलास २८ ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज अखेर दोघांचाही मृत्यू झाला आहे. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला तापमान कमी होताच स्वाइन फ्लूच्या विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. आत्तापर्यंत १३२ स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. तर ४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या नऊ इतकी झाली आहे. 

बदलत्या वातावरणापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य आहे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे लगेच एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे विषाणूंचा प्रसार होतो. सर्वत्र झपाट्याने पसरणार्‍या  स्वाइन  फ्लूवर वेळीच आळा घालणे फार महत्त्वाचे आहे. विषाणूच्या संपर्कात आल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढतो मग या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असते.

बचाव किंवा उपचार
खोकला किंवा शिंक आल्यास रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करा. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. फ्लूची लक्षणे दिसताच सावधगिरी बाळगा आणि उपचार सुरू करा. थोड्या-थोड्या फरकाने हात साबणाने स्वच्छ धूत राहा. लोकांशी भेटताना हात मिळवणे, गळाभेट घेणे किंवा चुंबन घेण्याचे टाळा. अस्वच्छ हातांनी चेहर्‍याला स्पर्श करू नका. वापरलेला मास्क, टिश्यू पेपर पॅकबंद कचरापेटीत टाका.

कधीपर्यंत राहतो व्हायरस?
स्वाईन फ्लूचा एच एन व्हायरस स्टील, प्लास्टिकमध्ये २४ ते ४८ तास, कपडे, पेपरमध्ये ते १२ तास, टिश्यू पेपरमध्ये १५ मिनिटे, हातांमध्ये ३० मिनिटांपर्यंत कार्यरत राहू शकतो. हे व्हायरस डिटर्जंट, अल्कोहोल, ब्लीच वा साबणाद्वारे नष्ट केले जाऊ शकतात. यासाठी हातांची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.