Tue, Mar 26, 2019 12:15होमपेज › Pune › दहशतवादी साखळीतील आणखी दोघे अटक

दहशतवादी साखळीतील आणखी दोघे अटक

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 1:44AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील वानवडी आणि आकुर्डी भागातून तीन बांगलादेशींना पुणे दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केल्यानंतर त्यांच्याकडील माहितीवरून आणखी दोघांना अटक करण्यात आले आहे. एकाला अंबरनाथ आणि महाड येथून पकडले असून, त्यांच्याकडूनही बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहेत. दोघेही बंदी घातलेल्या ‘अरसानउल्ल बांगला टीम’ (एबीटी) या दहशतवादी संघटनेशी लागेबांधे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना पुण्यातील न्यायालयात हजर केले असता दोघांना 29 मार्चपयर्र्ंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मोहम्मद अझरअली मोहम्मद सुभान अल्ली  ऊर्फ राजा जिशुफ मंडोल (वय 30, रा. अंबरनाथ, जि. ठाणे, मूळ. कायबा पोस्ट, चेलतीबीडी थाना, जि. शाशा, बांगलादेश) व मोहम्मद हसनअली मोहम्मद अमीर अली (24, रा. महाड, मूळ. ग्रामगुधा, युनियन-गुधा थाना, सांछा, जि. जैशर, बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वींचे साथीदार मोहम्मद हबीदउर रहमान हबीब  ऊर्फ राज जेसूब मंडल (वय 31, मूळ राहणार सतानी, पुष्पकाली, जि. खुलना, बांगलादेश, सध्या राहणार आकुर्डी), मोहम्मद रिपन होस्सेन (वय 25, मूळ राहणार सतानी, पुष्पकाली, जि. खुलना, बांगलादेश, सध्या राहणार आकुर्डी) आणि हन्नान अन्वर हुसेन खान (वय 25, रा. बिराजकुंदी, शरियतपूर, बांगलादेश, सध्या राहणार वानवडी) यांना शनिवारी (17 मार्च) दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेशातील ‘अन्सार उल बांगला टीम’ (एटीबी) या दहशतवादाशी संबंधित असलेल्या व बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंध असल्याच्या माहितीवरून पुणे दहशतावादविरोधी पथकाने शनिवारी पुण्यातील वानवडी भागातून एकाला अटक केली होती. त्यानंतर त्याच्या माहितीवरून आकुर्डी परिसरातून दोघांना पकडण्यात आले होते.

एटीएसच्या पथकाने अटक करण्यात आलेल्या या तिघांचीही कसून चौकशी केली असता, त्यांचे आणखी साथीदार असण्याची दाट शक्यता पोलिसांच्या लक्षात आली. त्यात आणखी दोघांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पुणे व राज्य दहशतवाद विरोधी पथकाने महाड व अंबरनाथ येथे पथके पाठवून दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांचाही या बंदी घालण्यात 

आलेल्या संघटनेत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. दोघेही अल कायदा या दहशतावादी संघटनेच्या संपर्कातील, तसेच बांगलादेश सरकारने बंदी घातलेल्या ‘अन्सारउल बांगला टीम’ (एटीबी) या संघटनेतील सदस्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडूनही पोलिसांनी बनावट पॅनकार्ड तसेच आधार कार्ड जप्त केले आहे.

‘अरसानउल्ल बांगला टीम’ (एबीटी) दहशतवादी टोळी भारताने बंदी घातलेल्या अल कायदा संघटनेची फ्रन्ट ऑर्गनायझेशन असल्याचे मानले जाते. पाचही जणांनी एबीटी या संघटनेतील सदस्यांना वेळोवेळी मदत केली असून, तसेच आर्थिक  मदत केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यांनी आधार कार्ड कोठे बनविले व कोणी बनवून दिले. यात आणखी काही साथीदार आहेत का? तसेच याचा तपास करण्यात येत आहे.

सदस्यांना राहण्यास आश्रय दिला...

एटीएसने शनिवारी अटक केलेल्या तिघांनी एबीटी या संघटनेतील सदस्यांना आश्रय दिल्याचे समोर आले आहे. त्यावेळी मोहम्मद हसनअली मोहम्मद अमीर अली हा त्यांच्यासोबत राहण्यास होता, अशी माहितीही समोर आली आहे. तर, मोहमम्मद अझरअली मोहमम्मद सुभान अली याने बनावट कागदपत्र तयार करून दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी बनावट आधार व पॅनकार्ड काढले आहेत. दोघेही बांधकाम साईडवर सेेंट्रींगचे कामे करत असल्याचे प्राथमिक तपासात माहिती समोर आले आहे.