Thu, Jun 20, 2019 06:52होमपेज › Pune › आतापर्यंत दोनशे बिटकॉईन जप्‍त

आतापर्यंत दोनशे बिटकॉईन जप्‍त

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी

बिटकॉईन या आभासी चलनात चांगल्या परताव्याच्या आमिषाने हजारो नागरिकांची कोट्यवधींना फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांची ‘खोदा पहाट निकला चुहा’ अशीच अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्य आरोपींसह तब्बल बारा जणांना अटक केल्यानंतर आतापर्यंत 210 बिटकॉईन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यातही तक्रारदारांची संख्या हजारावर असताना केवळ 70 जणांनीच पोलिसांकडे धाव घेतली आहे.  आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याने तपासात गती मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

देशभरात धुमाकूळ घालणार्‍या बिटकॉईनचा पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी जंगजंग पछाडून अमित भारतद्वाज आणि त्याचा भाऊ विवेककुमार भारद्वाज या दोघांना बँकॉक येथून अटक केली. या दोघांकडून मोठे घबाड बाहेर पडेल, अशी अपेक्षा पोलिसांना होती. मात्र, भारद्वाजचे झालेले किडनी ट्रान्सप्लांट, इतर आजार या वैद्यकीय कारणांसह परदेशात असलेली माहिती यामुळे तपासामध्ये अनेक अडचणी येत आहेत. भारद्वाज आणि त्याच्या साथीदारांकडूनही पोलिसांना सहकार्य केले जात नाही. भारद्वाजचे दोन साथीदार ओमप्रकाश बागला (वय 28) आणि निकुंज वीरेंद्रकुमार जैन (रा. नवी दिल्ली) यांना अटक केली. त्यांच्याकडून प्रत्येकी 32.501 आणि 125.552 एवढे बिटकॉईन जप्त केले आहेत.

यापूर्वी सायबर पोलिसांनी 43.225 बिटकॉईन, 79 इथेरियम जप्त केले आहेत. या सर्वांची किंमत सुमारे 14 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. बागला, जैन आणि अमित भारद्वाज यांनी या व्यवसायात झालेला फायदा विविध बँक खात्यांमधून परदेशात पाठवला आहे, तो पैसा पुन्हा हस्तांतरित होऊ नये, याचीही तयारी करून ठेवली आहे. परंतु, हे तिघेही पोलिसांना बिटकॉईनचे मायनिंग करण्यासाठी असलेले सर्व्हर कुठे आहे, भारद्वाजच्या जीबी मायनर्स या कंपनीला येणारे बिटकॉईन कोणत्या गेटवेला पाठवले आहेत, याची कोणतीही माहिती पोलिसांना देत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 Tags : Pune, Two hundred, bitcoins, seized,