Fri, Apr 26, 2019 19:24होमपेज › Pune › दोन कचरा वाहनांस जीपीएस यंत्रणा 

दोन कचरा वाहनांस जीपीएस यंत्रणा 

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: Jun 01 2018 1:05AMपुणे : शिवाजी शिंदे 

कचर्‍याचा वाहनांवर काम करीत असलेल्या कामगारांच्या ‘कामचुकार’ धोरणास लगाम बसावा, यासाठी प्रशासनाने कचर्‍याची वाहतुक करणार्‍या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर दोन वाहनांवर तत्परतेने यंत्रणा बसविण्यात देखील आली; मात्र त्यामधील एका वाहनाची यंत्रणा बंद पडली आहे. 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत जमा होणारा कचरा आरोग्य विभागामार्फत उचलण्याचे काम करण्यात येते. यासाठी चार डंपर आणि आठ स्कीप लीडर ही वाहने सध्य वापरात आहेत. मागील काही वर्षापासून या वाहनांवर काम करीत असलेले कर्मचारी मनमानी पध्दतीने काम करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यातही कचर्‍याच्या वाहतुकीवर काम करणारे कर्मचारी इतर कर्मचार्‍यांपेक्षा कामात जास्त कुचराई करीत असल्याचे देखील पुढे आले आहे. कचर्‍याची वाहने वेळेवर कचरा डेपोवर न नेणे, मध्येच वाहने थांबवून स्वत:ची कामे करणे अशा विविध तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.

ही बाब लक्षात घेऊन, मागील वर्षी झालेल्या सर्वसाधारणसभेत ही जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडिअर राजीव सेठी यांनी पुढाकार घेतला होता. याबाबत सर्वच नगरसेवक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील मान्यता दिली. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर दोन वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय झाला.

कार्यलयातील संगणकावर या गाड्यांसंदर्भात माहिती घेण्याची सोय करून देण्यात आली. परिणामी पहिले काही दिवस ज्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली, त्या वाहनांवरील कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत होते. मात्र हळूहळू या यंत्रणेची देखभाल आणि त्याचबरोबर त्यावर काम करणार्‍या एजन्सीचे दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे मागील काही महिन्यात एका वाहनांवरील यंत्रणा बंद पडली. प्रायोगिक तत्वावर यंत्रणा सुरू करण्यात आलेल्या दोन वाहनांची ही अवस्था असेल, दहा वाहनांवर ही जीपीएस यंत्रणा बसविण्यासंदर्भात प्रशासन आणि संबंधित कर्मचारी किती गंभीर असतील, हा प्रश्‍नच आहे.