Wed, Apr 01, 2020 22:53होमपेज › Pune › दोन टोळक्यांत तुंबळ हाणामारी

दोन टोळक्यांत तुंबळ हाणामारी

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:39AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी  

किरकोळ कारणावरून दोन तरुणांमध्ये वाद झाल्याने दोन टोळक्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना महर्षीनगर परिसरातील विठाबाई पुजारी उद्यानासमोर गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेत दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकाविरोधात दिलेल्या तक्रारीवरून एकूण सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा ते सात जणांना अटक केली आहे. 

सागर मल्लिकीर्जून शेकापुरे (21, गुलटेकडी) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन परशुराम माने, टिक्या शेलार, सौरभ खोपटकर, विपूल इंगवले, आकाश परदेशी, कुणाल जाधव, राहूल भरगुडे, दुर्वेश शितोळे (रा. घोरपडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सचिन परशुराम माने (19, गुलटेकडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार बाबू मल्लिकार्जून शेकापुरे, शंकर नागप्पा निखले (29), सचिन हनुमंत हत्ती (22), सचिन सीताराम शिंगे (23), सागर मल्लिकार्जुन शेकापुरे (21), अनिल सोमनाथ कांबळे (24), संजय उत्तम नडगेरी (25, सर्व रा. गुलटेकडी)  यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील सचिन माने हा गुलटेकडी परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहतीत राहण्यास आहे. तो रात्री साडेअकराच्या सुमारास महर्षीनगर येथील विठाबाई पुजारी उद्यानासमोर त्याच्या मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी संजय नडगेरी हा त्याच्या मित्रांसह तेथे मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संत नामदेव शाळेच्या कमानीजवळ आला होता. काही वेळाने तो गार्डनमधील अंधारात लघवीसाठी जात होता. त्यामुळे सचिन माने याने त्याला बाग बंद केलेली असताना गेट का उघडले, याचा जाब विचारला. त्यावरून दोघांत बाचाबाची झाली.

त्यानंतर नडगेरी याने सचिन माने याची गचांडी पकडली. सचिन माने व त्याच्यामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर संजय नडगेरी हा ओरडत त्याच्या मित्रांकडे गेला आणि त्याला सचिन माने व त्याच्या मित्रांनी मारहाण केल्याचे त्याच्या मित्रांना सांगितले. त्यानंतर संजय नडगिरे याचे मित्र आणि सचिन माने याचे मित्र यांच्यात तुंबळ हाणामारी जुंपली. तर सचिन माने याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. तसेच सागर शेकापुरे यालाही लाकडी दांडक्याने मारहाण झाली. त्यानंतर या राड्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्वारगेट पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी सहा ते सात तरुणांना अटक केली आहे. पुढील तपास स्वारगेट पोलिस करीत आहेत.