होमपेज › Pune › पोलिसांवर वर्षासाठी दोन कोटींचा खर्च

पोलिसांवर वर्षासाठी दोन कोटींचा खर्च

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 1:58AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते. त्यासाठी पालिका शहर पोलिसांकडून पोलिस बंदोबस्त घेते. त्या पोलिस संरक्षणापोटी म्हणजे वेतन म्हणून एका वर्षाला पालिका तब्बल 1 कोटी 92 लाख 23 हजार 692 रुपये खर्च करीत आहे. 

शहरातील अनधिकृत बांधकामे, रस्ते व पदपथ आणि पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पालिका कारवाई करीत असते. पोलिस बंदोबस्तामध्ये ही कारवाई होते. बंदोबस्त मिळाल्यानंतरच पालिकेच्या पथकास कारवाई करता येते. नियमितपणे बंदोबस्त मिळत नसल्याने पालिकेने स्वत:कडे 1 पोलिस उपनिरीक्षक व 26 पोलिस कर्मचारी असा एकूण 27 जणांचा ताफा ठेवला आहे.  कारवाई करताना हे पोलिस बळ पालिकेच्या पथकास मदत करते. दरम्यान, 3 पोलिस कर्मचारी निवृत्त झाले असून, सध्या 23 कर्मचारी उपलब्ध आहेत. त्याना शहर पोलिसांमध्ये दर महिन्यास वेतन दिले जाते. पोलिस दलाकडून मागणी आल्यानंतर पालिका उपलब्ध करून दिलेल्या पोलिस बळानुसार पोलिसांकडे निधी वर्ग करते. 

यंदा जानेवारी 2016 ते फेबु्रवारी 2017 या 14 महिन्यांसाठी 1 कोटी 62 लाख 23 हजार 692 रूपयांची मागणी पोलिस दलाने केली आहे. या खर्चास बुधवारी (दि.21) होणार्‍या स्थायी समिती सभेत मंजुरी दिली जाणार आहे. यापूर्वी पालिकेने जानेवारी ते डिसेंबर 2015 या एकासाठी 1 कोटी 20 लाख 37 हजार 520 रुपयांचा निधी अदा केला होता. अद्याप मार्च 2017 ते फेब्रुवारी 2017 पर्यंतच्या वेतनापोटीचा निधी देणे शिल्‍लक आहे. दरम्यान, नियमितपणे कारवाईसाठी जवळच्या पोलिस ठाण्याकडे वारंवार मागणी करूनही आवश्यक पोलिस बंदोबस्त मिळत नाही. त्यामुळे अनेकदा कारवाई पुढे ढकलली जाते. त्यामुळे पालिकेस कायमस्वरूपी 50 पोलिस कर्मचारी देण्याची मागणी आयुक्तांनी केली आहे. त्यासंदर्भात पोलिस आयुक्तालयाकडे पाठपुरावा केला जात आहे.

पोलिस दलाकडून मागणी झाल्यानंतर त्यानुसार निधी दिला जातो. राज्य शासनामार्फत पोलिस कर्मचारी व अधिकार्‍यांना दिल्या जाणारा वेतनासह इतर भत्तेही पालिकेस द्यावे लागतात. दर महिन्याचे त्यांचे वेतन पोलिस दल अदा करते. मागणीनुसार वर्षभराचा निधी पालिका अदा करते. - आबासाहेब ढवळे, स्थापत्य विभागाचे उपअभियंता 

 

Tags : Pimpri, Pimpri News,  Pimpri Chinchwad Municipal Corporation, Police,