Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Pune › चाकणला पावणेदोन कोटींचा गुटखा जप्त

चाकणला पावणेदोन कोटींचा गुटखा जप्त

Published On: Mar 17 2018 12:08AM | Last Updated: Mar 17 2018 12:08AMचाकण : वार्ताहर

गुजरातमधून पुण्यात चार टेम्पोत पोत्यात भरून आणण्यात येणारा सुमारे पावणेदोन कोटींचा गुटखा जप्त करण्यात आल्याची कारवाई शुक्रवारी (दि. 16) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरुळी (ता. खेड) येथे सापळा रचून करण्यात आली आहे.  

पान मसाला, सुगंधी सुपारी व तंबाखू असा 1 कोटी 70 लाख 80 हजार रुपयांचा गुटखा व चार टेम्पो अशा एकूण तब्बल 2 कोटी 32 लाख 80 हजारांच्या मुद्देमालासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अंमलीपदार्थविरोधी पथक, चाकण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन (एफडीआय) यांच्याकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे गुटखामाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.  पुणे जिल्ह्यात गुटखा आणला जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंमलीपदार्थविरोधी पथकाचे अधिकारी आणि चाकण पोलीस यांनी कुरुळी भागात एका पेट्रोलपंपावर शुक्रवारी पहाटे सापळा रचून ही कारवाई केली. 

पान मसाला, सुगंधी सुपारी असा कोट्यवधी रुपयांचा गुटखा अहमदाबाद (गुजरात) येथून पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषणच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रदीप पवार, उपनिरीक्षक अर्चना दयाळ व त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने रात्रभर पुणे-नाशिक महामार्गावर सापळा लावला होता. त्यानंतर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास टेम्पो (जीजे 01 इटी 2518), (एमएच 43 बीजी 4707), (जीजे 27 एक्स 3382), आणि (जीजे 01 डी झेड 1974) हे चार टेम्पो चाकणजवळ कुरुळी (ता. खेड) फाट्यावरील एचपी पंपावर ही वाहने अडविली. 

टेम्पोचालकांनी कापडांची वाहतूक करीत असल्याचे सांगून कापडांची चलने दाखविली. मात्र वाहनातील मालाची तपासणी केली असता पोत्यांमध्ये आणि बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला. एफडीआयचे सहाय्यक आयुक्त अर्जुन भुजबळ, संजय नारगुडे यांच्या पथकाने खात्री केली व संबंधित चारही टेम्पोमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित सुपारी व तंबाखू असल्याचे निष्पन्न झाले. 

एफडीआयने गुटखा भरलेले चार टेम्पो चाकण पोलीस ठाण्यात आणून गुटख्याची शुक्रवारी दुपारपर्यंत मोजदाद केली असता विमल पान मसाला, सुगंधी तंबाखू व सुपारी असा 1 कोटी 70 लाख 80 हजारांचा गुटखा व चार टेम्पोंसह एकूण 2 कोटी 32 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगितले. याप्रकरणी गुटखामाफिया निलेश बोराटे (रा. मोशी, ता. हवेली) यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे भुजबळ, संजय नारगुडे यांनी सांगितले. पुढील तपास सुरु आहे.  

गुटखा माफिया रडारवर
मागील दोन दिवसांपासून गुटखामाफियांना प्रशासनाने रडारवर घेतले आहे. इंदूरकडून पुण्याकडे आलिशान बसमधून आणण्यात येणारा पान मसाला असा 25 लाखांचा गुटखा गुरुवारी (दि. 15) निगडी (पुणे) मध्ये जप्त करण्यात आला होता. त्यात मेदनकरवाडी (चाकण, ता. खेड) येथील गुप्ता नामक गुटखामाफिया मिळून आला होता. त्यानंतर शुक्रवारी पहाटे चाकणजवळ पावणेदोन कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. चाकणजवळ जप्त करण्यात आलेला गुटखा निलेश बोराटे (रा. मोशी, पुणे) नामक गुटखामाफियाचा असून त्याच्यावर यापूर्वीही प्रतिबंधित गुटख्याच्या प्रकरणात कारवाई झालेली आहे. बोराटे याच्यावर एमपीइडीअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीआयचे सहाय्यक आयुक्त अर्जुन भुजबळ यांनी सांगितले.