Tue, Jul 16, 2019 14:04होमपेज › Pune › दोन बीट मार्शल निलंबित

दोन बीट मार्शल निलंबित

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी

इंजिनिअरचे कारमधून अपहरण करून  खंडणी म्हणून उकळलेले 14 लाख 30 हजारांतील 2 लाख 40 हजार रुपये भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या दोन बीट मार्शलनी घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. या दोन बीट मार्शलचे परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबन केले. दरम्यान, दोघांनी 2 लाख 40 घेऊन ते पैसे पोलिस ठाण्यातील लॉकरमध्ये ठेवल्याचे उघडकीस आले आहे. हे पैसे जप्त करण्यात आले आहेत. 

पोलिस शिपाई अशोक जकप्पा मसाळ, सुरेश सोमलिंग बनसोडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची नावे आहेत. याबाबत राहुल मनोहर कटकमवार (वय  37, रा. सिंहगड रोड) यांनी तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटकमवार हे 22 मे रोजी सायंकाळी त्यांच्या डस्टर कारमधून घरी निघाले होते. त्यावेळी बी. टी. कवडे रोडवरील सोपान बाग येथे अज्ञात आरोपींनी त्यांच्या कारला दुचाकी आडवी लावून थांबविले. त्यानंतर कारमध्ये जबरदस्तीने घुसून कारचा ताबा घेतला. तसेच, पिस्तुलाचा धाक दाखवून कटकमवार यांना जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. त्यांना नानापेठ, सेव्हन लव्हज चौक असे फिरवून कात्रज घाटात घेऊन गेले.

राहुल यांच्याकडून काही खंडणीचे पैसे उकळले. पण, आणखी पैसे त्यांनी नातेवाईकांकडून मागविले होते. ते पैसे घेण्यासाठी आरोपी कटकमवार यांना घेऊन भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गालगत थांबले होते. त्यावेळी गस्तीवर असलेल्या दोन बीट मार्शल मसाळ व बनसोडे यांना कारचा संशय आला. त्यांनी आरोपींकडे चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी जमिनीच्या व्यवहारासाठी थांबल्याचे सांगितले. एकजण येणार आहे, त्यावेळी त्यांना गाडीमध्ये पैसे दिसले. पोलिस अधिक चौकशी करू लागल्यानंतर आरोपी पोलिसांना बाजूला घेऊन गेले. 

त्यांनी बीट मार्शल यांना खंडणीच्या पैशांतील 2 लाख 40 हजार रुपये दिले. यानंतर आरोपींनी कटकमवार यांना सोडून दिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून तपास सुरू होता. त्यावेळी गुन्हे शाखेने तपास केला. तसेच, गस्तीवर कोण होते, याबाबत माहिती घेण्यात आली. त्यावेळी मसाळ व बनसोडे हे असल्याचे समोर आले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले व युनिट पाचचे दत्ता चव्हाण यांनी दोघांकडे चौकशी केली. त्यात पैसे घेतल्याचे समोर आले. हे पैसे पोलिस ठाण्यातील त्यांच्या लॉकरमध्ये ठेवले होते. त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी पिशवीत हे पैसे आढळून आले. या दोघांनी शिस्तबद्ध पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन करणारे बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी उपायुक्त मुंढे यांनी त्यांना निलंबित केले.