Thu, Jun 27, 2019 14:03होमपेज › Pune › महिन्यातून दोनदा ‘दप्तरमुक्‍त’ उपक्रम

महिन्यातून दोनदा ‘दप्तरमुक्‍त’ उपक्रम

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:33AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी ‘दप्तरविना शाळा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या दिवशी मास पी. टी. (कवायत), ग्रंथ प्रदर्शन, वाचन, व्याख्यान, कविसंमेलन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सदर निर्णयाला पालिकेच्या शिक्षण समितीच्या गुरुवारी (दि. 19) झालेल्या पहिल्या सभेत मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. सोनाली गव्हाणे होत्या. पालिकेच्या एकूण 105 प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या 87, उर्दू माध्यमाच्या 14, हिंदी माध्यमाच्या 2 आणि इंग्रजी माध्यमाच्या 2 शाळा आहेत. पहिली ते सातवीची विद्यार्थी संख्या एकूण 37 हजार 973 आहे. 

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता, कला, क्रीडा नेतृत्व गुणांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण दप्तरविना शाळा (वाचू आनंदे) उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी आयोजित केला जाणार आहे. त्या दिवशी परिपाठाच्या वेळी विविध साहित्यांची माहिती दिली जाईल. साहित्यिकांचया छायाचित्रांचे व ग्रंंथ प्रदर्शनाचे भरविले जाईल. विद्यार्थी व शिक्षक कथा, कांदबर्‍या, काव्यसंग्रह, विविध विषयांचे संदर्भ साहित्याचे वाचन करतील. साहित्यकांचे व्याख्यान, कविसंमेलन, साहित्य वाचन केले जाईल. तसेच, शाळा स्तरावर एखादा नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या निर्णयास समितीने मान्यता दिली. 

तसेच, पालिकेच्या 105 प्राथमिक शाळा आणि 18 माध्यमिक शाळांमध्ये गुरुवारी (दि. 26) कारगिल विजय दिवस साजरा केला जाणार आहे. कारगिल युद्धामध्ये मिळविलेल्या विजयाचे व शहीद झालेल्या जवानांना स्मरून व त्यांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी म्हणून तो दिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जाणार आहे. त्या निर्णयाला आयत्यावेळी मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर योग दिवस साजरा करण्याचा विषय चर्चेत आला. मात्र, त्याऐवजी दररोज परिपाठानंतर 15 मिनिटे योगासन घेण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शिक्षकांची जबाबदारी आदींसह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. नवनियुक्त सभापती व सदस्यांचे प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी स्वागत केले. 

‘स्थापत्य’, ‘विद्युत’च्या अधिकार्‍यांनी उपस्थित राहावे

शिक्षण समितीच्या सभेत प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या गुरुवारी आयोजित केली जाते. समितीची पहिला सभा गुरुवारी झाली. त्या सभेला केवळ शिक्षण समितीचे अधिकारी उपस्थित होते. त्यावर समिती अध्यक्षा सोनाली गव्हाणे यांनी नाराजी व्यक्‍त केली. शिक्षण विभागाशी संबंधित स्थापत्य, विद्युत तसेच, अतिरिक्त आयुक्तांनी उपस्थित राहावे, अशी सूचना त्यांनी केली.