Wed, Jun 26, 2019 23:31होमपेज › Pune › ’झिंगाट’ पुणेकरांना सव्वातीन कोटींचा दंड

’झिंगाट’ पुणेकरांना सव्वातीन कोटींचा दंड

Published On: Jun 18 2018 1:20AM | Last Updated: Jun 18 2018 1:15AMपुणे : अक्षय फाटक

राज्याची सांस्कृतिक राजधानी, सुसंस्कृत आणि शिक्षणाचे माहेर घर ओळख असणार्‍या शहराने आता ‘झिंगाट’ शहर अशीही ओळख निर्माण होत आहे. कारण, दीड वर्षात वाहतूक पोलिसांनी अशा 26 हजार झिंगाट बहाद्दर वाहन चालकांवर कारवाई केली. न्यायालयाने त्यांना तब्बल सव्वातीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. धक्कादायक म्हणजे, या मद्यपी वाहन चालकांविरोधात तीव्र मोहीम राबविल्यानंतरही हा आकडा दिवसेंदिवस फुगतच चालला आहे.  यंदा पाच महिन्यांत पाच हजार मद्यपींवर कारवाई झाली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराने जवळपास 60 लाखांहून अधिक लोख संख्येचा आकडा पार केला आहे. त्यानुसार, शहरात दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या चाळीस लाखांहून अधिक आहे. तर, दररोज जिल्ह्यातून आणि बाहेरून दाखल होणार्‍यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. एकीकडे पुणेकर वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. त्यातही शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहतुकीने मेटाकुटीला आलेल्या पुणेकरांना कमी काय म्हणून बेशिस्त वाहन चालकांचा सामना करत रस्ता शोधावा लागतो. तर, जागा मिळेल तिथे अन् दिसेल त्याठिकाणी पार्किंग धोरणामुळे या वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळते. शहरातील काही भागात असणार्‍या बड्या हॉटेल्ससमोर सर्रास बेशिस्त वाहने थांबविली जातात. मात्र, या सर्वामुळे सामान्य वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. 

सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवून व  रस्त्यांवरही थांबून बेशिस्तांवर कारवाई होते. मात्र हे प्रमाण कमी होत नाही.  तीन पेक्षा जास्त वेळा नियम मोडणारे 51 हजार, तर पाच पेक्षा जास्त वेळा नियम मोडणांर्‍याची संख्या दहा हजारांच्या घरात आहे. या वाहन चालकांमुळे वाहतूक कोेंडीत भर पडत आहेच. त्याहून धक्कादायक म्हणजे, झिंगाट वाहन चालकांची मोठी डोकीदुखी सामान्य पुणेकरांना सहन करावी लागत आहे. या संख्येत दिवसांगणिक वाढ होत आहे. मद्यपी वाहन चालकांमुळे वाहतूक कोेंडीत भर पडत तर आहेच. परंतु, अपघातालाही निमंत्रण मिळत असून या मद्यपींमुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागत आहेत. दीड वर्षात पोलिसांनी 26 हजार 640 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच, वाहतूक पोलिसांनी गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या कारवाईत तब्बल साडेसात हजार वाहन परवाने रद्द करण्यासाठी आरटीओ कार्यालयाला पाठविले आहेत. 2017 मध्ये 6 हजार परवाने रद्दसाठी पाठविले होते.

तर, यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात दीड हजार वाहन परवाने रद्दबादल करण्यासाठी देण्यात आले आहेत. पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने गेल्या वर्षात (2017) तब्बल 21 हजार 811 झिंगाट वाहन चालकांवर कारवाई केली आहे. न्यायालयाने यांना 2 कोटी 4 लाख 4 हजार 850 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, यंदा (मे 2018 पर्यंत) केवळ पाच महिन्यात 4 हजार 829 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. न्यायालयाकडून त्यांना 1 कोटी 20 लाख 11 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला गेला.

आकडा लाखाच्या घरात जाईल...

वाहतूक पोलिस शहरात अधून-मधून अचानक ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम काही तासांसाठी राबवितात. त्यातही रात्री ही कारवाई होते. त्यात हजारांवर मद्यपी पोलिसांना सापडतात. परंतु, पोलिसांनी दररोज ही कारवाई सुरू केल्यास हा आकडा लाखांच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले. सुसंस्कृत शहराचे बिघडत चाललेले स्वास्थ राखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. काही वषार्र्ंपूर्वी ठाणे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर न्यायालयाने या मद्यपींना दंड तर ठोठावला होताच. परंतु, काही दिवस शिक्षाही सुनावली होती. त्यानंतर हे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. 

पाहणार्‍याला भीती वाटते..

शहरात शिक्षण तसेच नोकरीनिमित्ताने तरुण-तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मध्यरात्री अशा तरुणांकडून वाहने चालवताना पाहिल्यास पाहणार्‍यालाच भीती वाटेल, अशी परिस्थिती असते. मात्र, अचानक पोलिसांनी या झिंगाट बहाद्दरांना पकडल्यानंतर यापुढे अशी चुक करणार नाही आणि दारूही पिणार नाही, अशी विनवणी पोलिसांसमोर करतात.  अनेकांकडून  झिंगाटगिरी पालकांना समजू नये, यासाठी प्रयत्न सुरू असतात, असे खिसे पोलिसांनी खासगीत बोलताना सांगितले.