Thu, Apr 25, 2019 13:40होमपेज › Pune › पंचवीस लाखांसाठी अपहरण, मारहाण

पंचवीस लाखांसाठी अपहरण, मारहाण

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:13AMपिंपरी : प्रतिनिधी

‘डिजीटल मार्केटींग’ या विषयावर लोकांकडून पैसे घेवून केलेल्या कार्यक्रमामुळे नुकसान झाले असून त्याच्या भरपाईपोटी  25 लाख द्यावे यासाठी दोघांचे अपहरण करुन, मारहाण करण्यात आली. तसेच घरातील दोन लाख 40 हजार आणि कार घेवून गेल्याची घटना सोमवारी रात्री नऊ ते पहाटे तीन दरम्यान बावधन ते खेड शिवापुर दरम्यान घडली.

संदीपकुमार झुंबरलाल पोकर्णी  (43, रा. बावधन) आणि नितिन सांगळे असे अपहरण व सुटका झालेल्यांची नावे आहेत. तर कृष्णा वारे, विजय, विकास व त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोखर्णी यांची बावधन परिसरात एज्युकेशन संस्था आहे. नितिन सांगळे हे त्यांचे मित्र आहे. डिसेंबर 2017 मध्ये सांगळे आणि पोकर्णी यांनी औरंगाबाद परिसरात ‘डिजीटल मार्केटींग’ या विषयावर सेमिनार घेतले होते. यामध्ये लोकांना पैसे घेवून ट्रेनिंग दिले होते. यावेळी लोकांनी साडेचार लाख रुपये वारे यांच्या खात्यावर भरले होते. पैसे परत न केल्याने लोकांनी नितीन सागळे यांच्याकडे तगादा लावला. त्यामुळे पोकर्णी यांनी मध्यस्ती करुन वारे यांना लोकांचे पैसे भरा असे सांगितले.

वारे यांनी पैसे परत न केल्याने पोकर्णी यांनी वारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असा सल्ला लोकांना दिला होता. सोमवारी रात्री पोकर्णी आणि नितिन सांगळे हे दोघे बाहेर निघाले होते. त्यावेळी रस्त्यावर डस्टर गाडीत वारे त्यांना भेटले. त्यांनी पोकर्णी व सांगळे या दोघांना त्यांच्या गाडीत बसवले. त्यानंतर त्यांना खेड शिवापुर येथे नेले. नुकसान झालेले 25 लाख दे म्हणून मारहाण केली. त्यावेळी पोकर्णी हे माझ्याकडे थोडे पैसे आहेत ते देतो मात्र मारु नका असे म्हणाले. त्यानंतर हे सगळे घरी आले, घरातील दोन लाख 40 हजार आणि कारची चावी काढून घेतली. कार घेऊन गेले. त्यानंतर सकाळी पोकर्णी हे हिंजवडी पोलिसांकडे आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या मागावर पोलिस पथक रवाना केले आहे. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

 

Tags : pune, pimpri news, crime, abductions, assault,