Tue, Jan 22, 2019 07:56होमपेज › Pune › बारा कट्टे, दोन पिस्तुले, २५ जिवंत काडतुसे जप्‍त

बारा कट्टे, दोन पिस्तुले, २५ जिवंत काडतुसे जप्‍त

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:46AMपुणे : प्रतिनिधी 

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणार्‍या एका सराईत गुंडाला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले, 12 गावठी कट्टे आणि 25 जिवंत काडतुसे असा सुमारे 3 लाख 25 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

संतोष विनायक नातू (वय 42, रा. झांबरे पॅलेस, स्वारगेट) असे या सराईताचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे परवेज शब्बीर जमादार यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 15 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 9.20 वाजता ही घटना घडली. 

स्वारगेट परिसरात संतोष नातू हा बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. संतोष स्वारगेट परिसरात आला. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून व त्याच्या संशयित हालचालीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो स्वारगेट परिसरात गावठी पिस्तूल, गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन आला आहे. 

पोलिसांनी त्याची झडती घेऊन दोन गावठी पिस्तुले, 12 गावठी कट्टे आणि 25 जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

जप्त करण्यात आलेले पिस्तूल हे विनोद नावाच्या इसमाकडून खरेदी केल्याचे संतोष सांगत आहे. त्यानुसार मथुरा येथे बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती करणारा व्यावसायिक कोण आहे? याचा तपास करायचा आहे.  हा माल खरेदी करण्यासाठी त्याला कोणी आर्थिक मदत केली, याचा तपास करायचा आहे. यापूर्वी संतोषने अशी बनावट पिस्तुले शहरात कोणाला विकली आहेत का? यासह गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी संतोषच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाच्या युक्‍तिवादानंतर त्याला 22 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.