Thu, Jul 18, 2019 16:38होमपेज › Pune › पुण्यात बंद हिंसक; दगडफेक, तोडफोड

पुण्यात बंद हिंसक; दगडफेक, तोडफोड

Published On: Sep 11 2018 1:40AM | Last Updated: Sep 11 2018 1:08AMपुणे : प्रतिनिधी

इंधन दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे आवाहन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, दुपारी या बंदला हिंसक वळण लागले. मनसेच्या आंदोलकांनी पीएमपीएलच्या सहा गाड्या फोडल्या. दोन गाड्यांमधील हवाही सोडून देण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.
ताडीवाला रोड, सिंहगड रोड, कोथरूड, डेक्कन जिमखाना, येरवडा, खडकी, औंध, बोपोडी, बिबवेवाडी, पर्वतीसह शहरामध्ये बंदला प्रतिसाद मिळाल्याचा दावा शहर काँग्रेसने केला आहे.  

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढीविरोधात भारत बंद अंतर्गत सोमवारी  पिंपरी चौकात काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.  त्यात राष्ट्रवादी, शेकाप, नागरी हक्‍क समिती, मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, श्यामला सोनवणे, गिरिजा कुदळे, संग्राम तावडे, सुदाम ढोरे, विष्णू नेवाळे, मयूर जयस्वाल, राजेंद्र वालिया, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, प्रवक्ते फझल शेख, विजय लोखंडे,  शेकापचे हरीश मोरे, नागरी हक्कचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मनसेचे राजू सावळे, समाजवादी पक्षाचे कुरेशी उपस्थित होते. या वेळी सचिन साठे म्हणाले की, शासनाने पेट्रोल, डिझेल दरवाढ केली; मात्र पेट्रोल, डिझेल जीएसटी खाली आणले नाही. अविचारीपणे नोटबंदी करून नरेंद्र मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचीच नसबंदी केल्याची टीका साठे यांनी केली.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर यात अवास्तव दरवाढ झाली आहे. आघाडी सरकारच्या काळातील दर व आत्ताचे दर पाहता यामध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे, हे या भाजप-शिवसेना सरकारचे अपयश आहे. चार वर्षांत या सरकारने 12 लाख कोटींचा कर वसूल केला आहे.

मनसे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी महापालिका भवनासमोर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग रोखून धरला. ग्रेडसेपरेटरमध्ये कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करीत पुण्यावरून निगडीकडे जाणारी वाहने मनसेने रोखून धरली.

पोलिसांनी या वेळी सचिन चिखले यांच्यासह अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, अदिती चावरीया, अनिता पांचाळ, शोभा चावरीया, मयूर चिंचवडे, अक्षय नाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.