Mon, Apr 22, 2019 03:49होमपेज › Pune › हवामानाचा अंदाज देणारी स्वयंचलित यंत्रणा बंद

हवामानाचा अंदाज देणारी स्वयंचलित यंत्रणा बंद

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 1:15AMपुणे : प्रतिनिधी

हवामानाचा अचूक अंदाज शेतकर्‍यांना मिळावा, यासाठी महावेध प्रकल्पाअंतर्गत पावसाची नोंद घेण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा (रेन गेज) कार्यान्वित करण्यात आली; मात्र महसूल विभागाकडून पावसाची माहिती पूर्वीप्रमाणेच संकलित केली जात आहे. कृषी विभागाकडून ही यंत्रणा कार्यान्वित असल्याचा दावा केला जात असला तरी महसूल विभागाकडून मात्र ही यंत्रणा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. कृषी आणि महसूल विभागातील हा विरोधाभास शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे.

हवामानाची अचूक माहिती मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांना सातत्याने पावसात पडणारा प्रदीर्घ खंड, दुबार पेरणीचे संकट, त्यासोबतच अवकाळी पावसामुळे होणारी नासाडी, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी कृषी विभाग आणि ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस’ यांच्या संयुक्‍त विद्यमाने राज्यात स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू करण्यात आली. या स्वयंचलित यंत्रणेच्या साहाय्याने तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती मोबाइलवर उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. या योजनेअंतर्गत राज्यातील 355 तालुक्यांतील 2065 महसूल मंडळांपैकी 2060 ठिकाणी पावसाची नोंद घेणारी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून दर दहा मिनिटांनी शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज उपलब्ध होणार होता. मात्र, ऐन पावसाळ्यातच यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ती सध्या बंद पडली आहे. शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. मात्र, सध्या तरी सरकारचा हा दावा फोल ठरला आहे. 

पाच ठिकाणी जागा उपलब्ध नाही 

राज्यातील सर्व महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक 101 केंद्रे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्यात 100, सोलापूर 91, नाशिक 92, बुलढाणा 90, सातारा 91, अहमदनगरमध्ये 97 केंद्रे आहेत. तर गडचिरोली 40, चंद्रपूर 50, गोंदिया 25, वर्धा 47 आणि नागपूर जिल्ह्यातील 70 केंद्रांचा यात समावेश आहे. यातील पाच मंडळांमध्ये जागा उपलब्ध न झाल्याने ही यंत्रणा कार्यान्वित झाली नाही, त्यात पुणे शहरातील दोन ठिकाणांचा समावेश आहे.