Wed, Jun 26, 2019 17:30होमपेज › Pune › पुण्याचा पाणीपुरवठा बंद करू

पुण्याचा पाणीपुरवठा बंद करू

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 1:15AMपुणे : प्रतिनिधी

ठरवून दिलेल्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वापरले जात असल्याच्या कारणावरून, तर कधी थकबाकीच्या कारणांवरून राज्याच्या जलसंपदा विभागाकडून वारंवार महापालिकेचे कान टोचले जात आहेत. पालिकेत व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असूनही वारंवार जलसंपदा विभागाकडून महापालिकेला डिवचले जात आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांचे काय सुरू 
आहे, हे पुणेकरांना समजत नाही. आत्ता पुन्हा एकदा जलसंपदा विभागाने पालिकेला 395 कोटींची पाणीपट्टीची थकबाकी 20 मार्चपर्यंत भरली नाही, तर शहराचे पाणी बंद करण्याचा इशारा दिला आहे. तसे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवले आहे.

महापालिका ही खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पिण्यासाठी पाणी घेते. ही धरणे जलसंपदा विभागाच्या ताब्यात असल्यामुळे महापालिकेला प्रत्येक वर्षी पाणीपट्टी भरावी लागते. जलसंपदा विभागाने महापालिकेकडे 354 कोटींची थकबाकी  असून, या वर्षीचे 40.82 कोटी अशी 395 कोटींची मागणी केली आहे. राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे ही रक्‍कम भरणे आवश्यक आहे. 

यापूर्वीसुद्धा जलसंपदा विभागाने थकबाकी वसुलीसाठी महापालिकेला पत्र पाठवली आहेत. यावर महापालिका प्रशासन बिलाची तपासणी करून निर्णय घेईल, अशी भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. आता जलसंपदा विभागाने 20 मार्चपर्यंतची अंतिम मुदत पालिका प्रशासनाला दिली आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी. बी. शेलार म्हणाले, महापालिकेबरोबर झालेल्या करारानुसार 1.25 टीएमसी पाणी महिन्याला घेणे अपेक्षित आहे; मात्र पालिका यापेक्षा जास्त पाणी वापरत आहे. महापालिकेला वारंवार पाण्याची बचत करण्याच्या सूचना देण्यात  आल्या आहेत. अन्यथा भविष्यामध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. महापालिका प्रशासनाने त्वरित थकबाकी भरावी असे त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, जलसंपदा विभागाने वाढीव बील पाठवले आहे. यासंदर्भात आम्ही बिलाची विस्तृत माहिती मागवली आहे. जोपर्यंत ही माहिती मिळत नाही तोपर्यंत बील भरता येणार नाही. महापालिका कोणत्याही प्रकारे अतिरिक्त पाणी वापर करत नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. पालिका प्रशासन हे जास्त पाणी वापरत असल्यामुळे नियमाप्रमाणे दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे 354 कोटींची थकबाकी झाली असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे महापालिका 10 टक्के पाणी हे व्यवसायिक वापरासाठी देते. करारामध्ये केवळ 2.5 टक्के म्हटले आहे. त्यामुळे बिलामध्ये रक्कम वाढवण्यात आली आहे. 

पालिका प्रशासन हे 97.50 टक्के पाणी हे घरगुती वापरासाठी देत असून, उरलेले पाणी व्यावसायिक वापरासाठी देत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी याच पद्धतीने बील जलसंपदा विभागाला अदा केले जाते. मात्र जलसंपदा विभागाने महापालिकेचा दावा चुकीचा असल्याचे म्हटल आहे. 2011 पासून 89 टक्के वापर घरगुती पाण्यासाठी आणि शिल्लक पाणीसाठा व्यावसायिक वापरासाठी देण्यात येत आहे. त्याचबरोबर 11.5 टीएमसी पेक्षा जास्त पाणी वापरल्यामुळे 354 कोटींची थकबाकी झाली असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.