होमपेज › Pune › तूर विक्रीस लागला नियमांचा भुंगा

तूर विक्रीस लागला नियमांचा भुंगा

Published On: Mar 11 2018 1:02AM | Last Updated: Mar 10 2018 11:27PMपुणे : नवनाथ शिंदे

शासनाच्या किचकट नियमांमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या तूर विक्रीला कागदपत्रांचा भुंगा लागला आहे. नाफेड फेडरेशनच्या जाचक अटींमुळे बारामती येथील तूर विक्री केंद्रात शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे; त्यामुळे प्रतिक्िवटल 5 हजार 450 चा भाव असणारी तूर व्यापार्‍यांकडून तीन ते साडेतीन हजारांत खरेदी केली जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. दुसरीकडे एक एकरात तुरीची उत्पन्न मर्यादा चार क्विंटलपेक्षा अधिक वाढल्यास उत्पन्नाची नोंद करण्यासाठी शेतकर्‍यांना तलाठ्यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत.  

डाळीच्या बेफाम दरवाढीला लगाम घालण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांना तूर लागवडील प्रोत्साहन दिले आहे. मात्र, तुरीचे उत्पन्न वाढल्यामुळे जिल्ह्यात ‘नाफेड’च्या माध्यमातून तुरीची खरेदी करण्यासाठी अनेक किचकट नियमांचा भुंगा शेतकर्‍यांना त्रासदायक ठरत आहे. तूर विक्री करण्यासाठी शेतकर्‍याला सात-बारावर प्रथमतः पीकपाण्याची नोंद लावणे, बँक पासबुक आधारकार्ड घेऊन बारामतीमधील नीरा कॅनॉल संघात तुरीची ऑनलाईन नोंद करावी लागत आहे.

त्यानंतर शेतकर्‍यांच्या मोबाईलवर तूर विक्रीसाठी मार्केट कमिटीत घेऊन येण्याबद्दल संदेश पाठविला जात आहे. दरम्यान नाफेड फेडरेशनच्या नियमानुसार तुरीला प्रतिक्विटंल 5 हजार 450 रुपये भाव मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना दिव्य पार करावे लागत आहे. त्यामध्ये तुरीमध्ये 12 टक्केपेक्षा कमी ओलावा असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा अधिक ओलावा असल्यास तुरीची खरेदी केली जात नाही. तसेच तुरीमध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक फुटक्या डाळीचे प्रमाण असल्यास खरेदी केली जात नाही.

तुरीची तपासणी करताना 100 ग्रॅममध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक अपरिपक्वता असल्यास खरेदीला नकार दिला जात आहे. दरम्यान शेतकर्‍यांची तूर मार्केट कमिटीत नेल्यानंतर तिची चाळणी केली जात आहे. त्यानंतर ग्रेडरद्वारे (प्रशिक्षित तपासणीस कर्मचारी) तुरीची तपासणी केली जाते. अशा विविध तपासण्यांमुळे आर्थिक विंवचनेत सापडलेला शेतकरी ‘नाफेड’च्या चाचण्यांतून व्यापार्‍यांच्या तावडीत अडकला जात आहे.                           

तूर उत्पादनासाठी जेवढा त्रास झाला नाही, तेवढा मनस्ताप विक्रीसाठी होत आहे. तुरीचे उत्पादन वाढल्यामुळे पीकपाण्याची नोंद लावण्यासाठी तलाठ्यांच्या हातापाया पडावे लागत आहे. ऑनलाईन तूर विक्री नोंदणी करणे, नाफेड फेडरेशनच्या नियमाप्रमाणे ग्रेडरनुसार तपासणी होत असल्याने खासगी बाजारभावाप्रमाणे तूर विक्री करावी लागत आहे.    - पोपट वाघमारे, बागायतदार, स्वामी चिंचोली, दौंड

शासनाच्या नियमानुसार शेतकर्‍यांची तूर नाफेड फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी केली जात आहे. तुरीची गुणवत्ता तपासणीसाठी प्रशिक्षित कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार गुणवत्ता तपासून खरेदीला प्राधान्य दिले जाते.    - बी. बी. वाडीकर, जिल्हा मार्केटिंग अधिकारी