होमपेज › Pune › तूर डाळ यंदा आवाक्यात

तूर डाळ यंदा आवाक्यात

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 12:31AM

बुकमार्क करा

पुणे : समीर सय्यद

जेवणातील अविभाज्य घटक असलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांतून 55 रुपये किलो दराने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाच्या पुरवठा विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे खुल्या बाजारात तूरडाळ 55 ते 60 रु. दराने मिळू लागली आहे. रेशन दुकानावर आणि खुल्या बाजारात तूरडाळीचे दर समान असल्याने आता सर्वसामान्यांच्या ताटात तूरडाळ सहज उपलब्ध होणार आहे. 

राज्यात गेल्या काही वर्षांत तुरीच्या उत्पादनात घट झाली होती; त्यामुळे तूरडाळीचे दर 200 रुपये किलोवर पोहोचले होते. डाळीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने राज्य सरकारवर सर्व स्तरांतून टीका झाली होती. 2016-17 च्या हंगामात तूर उत्पादन समाधानकारक झालेे. शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनांतर्गत तुरीची हमीभावाने खरेदी केली होती.

यामध्ये  स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत 25 लाख 25 हजार क्विंटल तूर खरेदी केल्याचा दावा सरकारने केला होता. खरेदी केलेल्या तुरीच्या भरडईस राज्य सरकारने परवानगी दिली होती. ही भरडई केलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून 55 रुपये किलो दरानेे विकण्याचा  महत्त्वपूर्ण निर्णय 30 नोव्हेंबर रोजी शासनाने जाहीर केला आहे.

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 55 रुपये किलो दराने तूरडाळ देण्याचा निर्णय घेतल्याने व्यापार्‍यांना आपल्याकडे असलेल्या तूरडाळीचे दर 55 ते 60 रुपयांवर आणावे लागले आहेत. या तूरडाळीची विक्री ई-पॉस मशिनने केल्यास 1.50 रुपये, तर मशिनव्यतिरिक्त  70 पैसे मार्जिन रास्त भाव दुकानदारांस दिले जाणार आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पुरवठा अधिकार्‍यांना वितरण करण्याची कार्यपद्धती निश्‍चित करून देण्यात आली आहे.

रेशनिंगवर तूरडाळ कोणत्या तारखेदरम्यान उपलब्ध होईल, अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती किती तूरडाळ घेता येईल, याची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे याबाबत संभ्रम  असून या निर्णयाचा फायदा शिधापत्रिकाधारकांना किती होणार आहे, हे स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे किती दिवसांनी डाळ प्रत्यक्षात उपलब्ध होईल याकडे लक्ष लागले आहे.