Tue, Apr 23, 2019 05:35होमपेज › Pune › माउली, तुकोबारायांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल

‘भक्‍ती सरी’त चिंब वारी...!

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:19AMपुणे ः नवनाथ शिंदे

माउली.. माउली.. नामाचा जयघोष...टाळ-मृदंगाचा गजर...डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी असा पोशाख... महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, फुगड्यांच्या फेर्‍या... रंगीबेरंगी  फुलांनी सजविलेला माउली आणि तुकाराम महाराजांचा रथ... ढगांनी भरून आलेले आभाळ.. मध्येच पावसाच्या रिमझिम सरी अशा भारावलेल्या वातावरणात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद‍्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांचे शनिवारी (दि. 7) सायंकाळी सातच्या सुमारास पुणे शहरात आगमन झाले. महापौर मुक्ता टिळक, आमदार विजय काळे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, स्वाती लोखंडे, आदित्य माळवे आदी मान्यवरांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

माउलींच्या पालखी सोहळ्याने सकाळी सहा वाजता आळंदीच्या आजोळ घरातून तर तुकाराम महाराजांच्या पालखीने आकुर्डीच्या श्री विठ्ठल मंदिरातून पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले हेाते. खांद्यावर भगवी पताका घेऊन विठुनामाचा गजर करत दिंड्यांचे मार्गक्रमण सुरू होते. 

माउलींच्या रथाला जोडलेली मानाची बैलजोडी, पारंपरिक वाद्यांसह नगारा, त्यानंतर दोन्ही अश्व अशा ऐटीत पालखीने फुलेनगर परिसरातील दुपारचा विसावा आटोपून पुण्याकडे मार्गक्रमण केले. हवेतील गारवा व ढगांनी भरलेले आभाळ आणि मध्येच येणार्‍या पावसाच्या सरींमुळे आल्हाददायक बनलेल्या वातावरणात सायंकाळी सातच्या सुमारास पालखी सोहळा वाकडेवाडी पुलाखाली पोहोचला.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरातून पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले होते. हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात वारकर्‍यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. दुपारी एकच्या सुमारास हा पालखी सोहळा दापोडी परिसरात विसाव्यासाठी थांबला. तेथे तुकोबारायांच्या पादुकांच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी रांगा लावल्या. ठिकठिकाणी वारकरी आणि भाविकांकडून महाराजांच्या पादुकांवर बुक्का, तुळशीपान, फुले, हारतुरे अर्पण करण्यात आले. 

पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांच्या स्वागतासाठी पालखी मार्गावर भाविकांकडून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तर आळंदी देवस्थान, देहू संस्थानच्यावतीने वारकर्‍यांच्या सेवेसाठी पाणी, औषधोपचाराची सोय करण्यात आली होती. दोन्ही पालख्यांचे स्वागत पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चौकाचौकात हारफुले, श्रीफळ, दिंड्यांना भेटवस्तू देऊन केले. ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी सोहळा सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास  भवानीपेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर तुकोबारायांचा पालखी सोहळा नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात विसावला.

वारकर्‍यांसाठी हजारो पुणेकरांनी खाद्यपदार्थ, जेवण, चहा, पाणी, नाश्त्याची सोय केली होती. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारच्या मुक्कामानंतर सोमवारी (दि.9) सकाळी सहाच्या सुमारास सासवडच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. तर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणी काळभोरच्या दिशेने प्रयाण करणार आहे.