Thu, May 23, 2019 20:26
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › देहूत वैष्णवांची मांदियाळी

देहूत वैष्णवांची मांदियाळी

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 1:10AMदेहूरोड : वार्ताहर

आषाढी वारीनिमित्त श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने गुरुवारी (दि. 5) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पहाटेपासूनच गावात भक्तिमय वातावरण होते. रात्रभर जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत केले होते; परंतु वारकर्‍यांना कुठल्याही संकटाची पर्वा नव्हती. सकाळी दहाच्या सुमारास पाऊस थांबला आणि देहूचे रस्ते गर्दीने फुलून गेले. सुमारे तीन लाख भाविक देहूत दाखल झाले होते.धन्य देहूगाव । पुण्यभूमी ठाव। नांदतसे देव । तेथे पांडुरंग ॥ या उक्तीप्रमाणे देहूच्या पुण्यभूमीत जणू देव पांडुरंग अवतरल्याचा भास होत होता. प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौकात टाळ-मृदुंगाचे ध्वनी कानावर पडत होते. भल्या पहाटे उठून भर पावसात इंद्रायणीच्या थंडगार पाण्यात वारकरी स्नान करीत होते. पांढराशुभ्र पोषाख, त्यावर वारकरी सांप्रदायाचे उपरणे, डोक्यावर फेटा, कपाळावर अष्टगंध आणि त्यात अबीर बुक्क्याचा टिक्का, गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका, असा पारंपरिक पेहराव करून वारकरी गावातील मंदिरांपुढे दर्शनासाठी रांगा लावताना दिसत होते. महिलाही पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मुख्य मंदिर, वैकुंठस्थान मंदिर, गाथा मंदिर आदी मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. 

धो-धो पाऊस असूनही गावातील विविध सार्वजनिक मंडळे आणि सेवाभावी संस्थांकडून भाविकांसाठी अन्नदानाचा उपक्रम सुरू होता. सकाळपासून अन्नपदार्थ तयार करण्यात कार्यकर्ते गर्क होते. गावातील जुन्या श्रीमंत नवशा गणपती अन्नदान मंडळाचे अध्यक्ष सुनील दामोदर मोरे म्हणाले की, दरवर्षी मंडळाच्या वतीने भाविकांना अन्नदान केले जाते. दिवसभरात जवळपास तीस हजार वारकरी या प्रसादाचा लाभ घेतात. दिवसभर अखंडपणे हे अन्नदान सुरू होते. श्री संत तुकाराम अन्नदान मंडळ, रोटरी क्‍लब यांच्या वतीनेही अन्नदान करण्यात आले. 

गावातील पेठांमध्ये विविध साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी भाविकांची गर्दी होती. लाह्या-बत्तासे, माव्याचे पेढे आदी प्रसादाचे जिन्नस, तर अबीर, बुक्का, कुंकू, अष्टगंध, तुळशीच्या माळा, धार्मिक पुस्तके, ग्रंथ, प्रवासात लागणार्‍या कापडी पिशव्या आदी साहित्य खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सकाळी साडेअकरापासून मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून देऊळवाड्यात सोडण्यास सुरुवात झाली. दिंड्या येत होत्या, नाचत बागडत आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामघोषात मंदिर प्रदक्षिणा घालून दक्षिण दरवाजाने बाहेर पडत होते. इतर भाविकांना दर्शनाबारीतून प्रवेश दिला जात होता. लष्करी शिस्तीप्रमाणे सर्वकाही नियोजनबद्ध सुरू होते. पावसाच्या सरी अधूनमधून बरसत होत्या. इंद्रायणीच्या  पाणीपातळीत वाढ झाली होती. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती या खासगी संस्थेचे 170 स्वयंसेवक पोलिसांना वाहतूक सुरळीत राखण्यात मदत करीत होते. एकंदरीतच सारी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.

पथकाकडून कसून तपासणी

देहूत पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त लाखो भाविक दाखल झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर घातपाताची शक्यता विचारात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त मंदिराच्या परिसरात लावला होता. सकाळी ग्रामीण पोलिसांचे बॉम्बशोधक व नाशक पथक देहूत दाखल झाले.