Mon, Jan 21, 2019 00:37होमपेज › Pune › ‘तुकोबा’ पालखीचा अश्‍व पुण्यात

‘तुकोबा’ पालखीचा अश्‍व पुण्यात

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी

जसजशी आषाढी एकादशी जवळ येते, तसतशी पालखी सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे.  संत तुकाराम महाराज पालखीच्या रिंगण सोहळ्यात धावणार्‍या घोड्याचे (अश्‍वाचे) देहूकडे प्रस्थान सुरू  असून सध्या हा घोडा (अश्‍व) पुण्यात दाखल झाला आहे. तसेच पुण्यात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार श्री. निवृत्ती महाराज गिराम (चोपदार) यांच्या पहिल्या दिंडीचेही आगमन झाले आहे.
जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथील इनामदार वाडा येथून पंढरपूरच्या दिशेने येत्या 5 जुलै रोजी प्रस्थान होणार आहे. त्या पालखीसमोर असणारी ‘माई दिंडी’ क्रमांक  बारा ही दरवर्षी देहूला जाण्यापूर्वी पुण्यात असते. ही दिंडी ज्येष्ठ शु. द्वादशीला देहूला जाण्यासाठी निघते आणि प्रस्थानादिवशी पोहचते. याच दिंडीसोबत पालखी रिंगण सोहळ्यात धावणारा अश्‍व असतो, हे या दिंडीचे वैशिष्ट्य आहे. 

रिंगण सोहळ्यातील अश्‍व (घोडा) परभणी जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील बाभळगाव येथील रहिवासी विनायक रणये पाटील यांचा  आहे. याच कुटुंबाचा अश्‍व रिंगण सोहळ्यात धावतो. त्याला देवाचा घोडा असेही वारकरी पंथात संबोधले जाते. हा अश्‍व देहूला प्रस्थानासाठी जाण्यापूर्वी पुण्यात नवी पेठ विठ्ठल मंदिर येथे मुक्कामासाठी असतो. त्यानंतर त्याचा पुढील मुक्काम आकुर्डी येथे असतो. नंतर हा अश्‍व देहूला प्रस्थानाच्या दिवशी पोहचतो. याअश्‍वाचे पुण्यात नवी पेठ विठ्ठल मंदिरात  स्वागत करण्यात आले. यावेळी मंदिर ट्रस्टचे सुभाष तोंडे, शिवाजी गवारे, संजय गाडे, नितीन नवले, बाळासाहेब काळभोर, गोविंद कडभाणे उपस्थित होते.