Thu, Apr 25, 2019 06:13होमपेज › Pune › ‘याचि देही, याचि डोळा’ भक्‍तांनी अनुभवला पालखी भेटीचा अभूतपूर्व सोहळा

‘याचि देही, याचि डोळा’ भक्‍तांनी अनुभवला पालखी भेटीचा अभूतपूर्व सोहळा

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 12:31AMपिंपरी : जगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांची आषाढी  वारीसाठी पंढरपूरला गेलेली पालखी पंढरपूरहून देहूकडे परतत असताना चिंचवडगावात बुधवारी (दि. 8) सकाळी विसावली. या वेळी श्रीमन महासाधू मोरया गोसावी व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या अभूतपूर्व भेटीचा सोहळा भक्‍तगणांनी ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला. 

संत तुकोबांच्या पालखीचा परतीचा प्रवास चिंचवडगावातून व्हावा, अशी मागणी भाविकांकडून सातत्याने होत होती. ती यावर्षी अखेर पूर्ण झाली. त्यामुळे तुकोेबांची पालखी प्रथमच चिंचवडगावात दाखल झाली. त्यावेळी भक्तगणांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  यावर्षी पहिल्यांदाच या पालखीने चिंचवडगावात पाहुणचार घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात, तसेच ‘मोरया मोरया’ व तुकोबा- ज्ञानोबाच्या जयघोषात चिंचवडकरांनी  पालखीचे स्वागत केले. यावेळी हजारो भाविकांनी मनोभावे पालखीचे दर्शन घेतले.  पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, चिंचवड देवस्थानचे मंदार देव महाराज आदी उपस्थित होते. संपूर्ण चिंचवडगाव  महासाधू मोरया गोसावी व ज्ञानोबा - तुकोबा यांचा जयघोषाने भक्‍तिमय झाले होते. या वेळी मंदार देव महाराज यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली. पालखी सोहळाप्रमुख सुनील मोरे यांचा देव महाराजांच्या हस्ते सत्कार झाला. या अभूतपूर्व पालखीभेट सोहळ्यानंतर भक्‍तीपूर्ण वातावरणात तुकोबांची पालखी देहूकडे मार्गस्थ झाली.