Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Pune › देहूत ‘तुकाराम बीज’ सोहळ्याची तयारी 

देहूत ‘तुकाराम बीज’ सोहळ्याची तयारी 

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 12:16AMदेहूरोड ः उमेश ओव्हाळ

देहुत तुकाराम बीज सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. विविध यंत्रणा आपापली काम पुर्ण करण्याच्या लगबगीत दिसत आहेत. तर संत तुकाराम संस्थानकडुन धार्मिक विधी तसेच सोहळ्याच्या नियोजनाची तयारी सुरू आहे

तुकाराम बीज अर्थात तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा यावर्षी 3 मार्चला होत आहे. अवघ्या चार दिवसांवर सोहळा आल्यामुळे सर्व यंत्रणा तयारीला लागल्या आहेत. गोपाळपुर्‍यातील नदीघाटाची सफाई सुरू आहे. बीज सोहळ्याला याच स्मशानभूमीतुन पालखी प्रदक्षिणेसाठी जाते. यावेळी पालखीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. वैकुंठस्थान मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असुन त्याची तपासणी केली जात आहे. यात्रेत एकाचवेळी लाखो भाविक एकाठिकाणी एकवटतात. त्यामुळे गर्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दरवर्षी या भागात पोलीसांच्यावतीने टेहळणी मनोरा उभारण्यात येतो. यावर्षी मात्र, अद्यापही या मनोर्‍याचे काम सुरू झाले नाही. 

वैकुंठस्थान मंदिरासमोर कायमस्वरूपी कीर्तन मंडप हटविल्यामुळे तात्पुरता कीर्तनमंडप उभारावा लागत आहे. यावर्षी मुबलक जागा उपलब्ध झाल्यामुळे मंदिराच्या समोर प्रशस्त जागेत मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. या भागात बीजेचे मुख्य कीर्तन होते. त्यामुळे परिसर थंड ठेवण्याचे ठेवण्यासाठी आधीपासूनच तयारी करावी लागते. दिवसातुन दोन-तीन वेळा या ठिकाणी जमीनीवर पाणी मारुन थंडावा टिकवून ठेवला जात आहे. पालखीसाठी गोपाळपुररा रस्त्यावर बॅरिकेटस् लावून स्वतंत्र मार्ग केला जातो. मात्र, मागील वर्षापासून हि परंपरा खंडीत झाली आहे. यावर्षीही पालखी थेट भाविकांच्या गर्दीतूनच नेण्यात येणार आहे.

संस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दशमीनंतर हा सोहळा सुरू होतो, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्‍वस्त सुनिल मोरे, विठ्ठल मोरे, अभिजीत मोरे यांनी दिली. ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील स्वच्छता, पथदिव्यांची दुरूस्ती आदी कामे सुरु आहेत. आरोग्य विभागाकडुन गावातील जलस्त्रोतांची पाहणी करण्यात येत आहे. तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. गावात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या दोन दिवसांत धुर फवारणी करण्यात येणार आहे.