Sun, Jun 16, 2019 02:29होमपेज › Pune › तुकोबा पालखी सोहळ्याचा मार्ग खड्ड्यांमुळे खडतर

तुकोबा पालखी सोहळ्याचा मार्ग खड्ड्यांमुळे खडतर

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 29 2018 12:36AMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

जगद‍्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या 5 जुलैला आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी संस्थान, वारकरी आणि शासनाचे विविध विभाग तयारीला लागले आहेत. काही पातळ्यांवर तयारी पूर्ण झाली असून, काही बाबतीत मात्र तयारी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी तयारी व नियोजनाच्या बैठकांनी उच्चांक गाठला आहे. या बैठकांना हजेरी लावता-लावता सोहळाप्रमुखांची दमछाक झाली. वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये सर्वात कळीचा मुद्दा ठरलेला रस्त्यांच्या डागडुजीचा प्रश्‍न मात्र अजूनही प्रलंबित आहे. अवघ्या आठवड्यावर आलेल्या या सोहळ्याचा मार्ग खड्डेमय रस्त्यांमुळे खडतर ठरणार आहे.

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदा 333 वे वर्ष आहे. वारकर्‍यांना सोहळा सुखद व्हावा यासाठी शासकीय पातळीवरही तयारी सुरू आहे. यावर्षी शासकीय बैठकांनी विक्रम केला आहे. प्रत्येक बैठकीत त्याच-त्या मुद्यावर वारंवार चर्चा झाली. रस्ते, वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, शुद्ध पाण्याचा पुरवठा, वाहनतळ, वाहतूक नियोजन, नदी पात्रात पुरेसे पाणी आदी विषयांवर बैठकीत दरवर्षीप्रमाणे चर्चा झाली. त्यानुसार काही विभागांनी आपली कामे पूर्ण केली आहेत; मात्र काही कामांना अद्याप सुरुवातच झाली नाही. यामध्ये रस्त्याच्या कामाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. देहूतून देहूरोडकडे येताना जिल्हा परिषद शाळा, कापूर ओढा, अनगडशा दर्गा, माळीनगर, झेंडेमळा, सीओडी डेपो, एमई लाइन, शनिमंदिर, चिंचोली या भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नुकतेच जलवाहिन्या आणि भूमिगत गटारांचे काम केले. जिल्हा परिषद शाळेपासून कापूर ओढ्यापर्यंत मुख्य रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून हे काम करण्यात आले. काम झाल्यावर रस्त्याची डागडुजी मात्र जुजबी स्वरूपात करण्यात आली.

त्यामुळे या भागात आता ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. माळीनगर ते देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीच्या फलकापर्यंत रस्त्याची हीच अवस्था आहे. ग्रामस्थांनी व्यक्तिगत नळजोडासाठी रस्ता खोदला आहे. अशा खोदकामाचे अनेक खड्डे या भागात दिसून येतात. ग्रामपंचायतीने हा रस्ता पिंपरी- चिंचवड महापालिकेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी पालिकेकडून केली जाते; मात्र  मागील दोन वर्षात पालिकेने या कामाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. हाच रस्ता पुढे सीओडी डेपोपासून देहू फाट्यापर्यंत (पुणे-मुंबई महामार्ग) लष्कराच्या मालकीचा आहे. त्यामुळे त्याच्या डागडुजीस अनेक अडचणी येतात. कॅन्टोन्मेंट बोर्ड ही स्थानिक प्रशासन यंत्रणा असल्याने त्यांनी या रस्त्याची डागडुजी करावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. हा रस्ता पूर्वीपासून एमईएसच्या ताब्यात असल्याने त्यांनीच त्याची डागडुजी करावी, असे बोर्ड प्रशासनाकडून सांगितले जाते. या टोलवाटोलवीमुळे या रस्त्याचे काम अजूनही रखडले आहे. चिंचोली येथील संजय कॉलनीजवळ रस्त्यावर पाण्याची तळी साचली आहेत. त्यामुळे यावर्षी पालखी सोहळ्याच्या सुरुवातीचा मार्ग खडतर ठरण्याची चिन्हे आहेत.