Thu, Apr 25, 2019 03:29होमपेज › Pune › तुकाराम मुंढेंना भोवली राजकीय नाराजी  

तुकाराम मुंढेंना भोवली राजकीय नाराजी  

Published On: Feb 08 2018 11:22AM | Last Updated: Feb 08 2018 12:55PMपुणे : प्रतिनिधी

शहरातील भाजपच्या नेत्यांची नाराजी; तसेच बदलीसाठी त्यांनी घेतलेल्या जोरदार भूमिकेमुळे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश मुख्यमंत्र्यांना काढावे लागल्याची चर्चा आहे.

मागील अनेक वर्षांपासून पीएमपीला सक्षम व्यवस्थापकीय संचालक नसल्यामुळे पीएमपीमधील अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करीत होते. परिणामी पीएमपीचा कारभार कायमच तोट्यात चालला होता. त्यामुळेच पीएमपीचे  रुतलेले चाक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली.

मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आणि घेतलेले निर्णय तत्काळ  अमलात आणले.  परिणामी मुंढे आणि कर्मचारी यांच्यामध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. त्यातच मुंढे  यांनी राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप बंद करून सदस्यांची नाराजी ओढवून घेतली होती. 29 मार्च 2017 रोजी पदभार स्विकारल्यानंतर पुढील दहा महिन्यांच्या कार्यकाळात मुंढे यांनी आक्रमक भूमिका घेऊन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

पीएमपीमधील बेशिस्तपणा कमी करण्यास तातडीने सुरुवात करीत कामचुकार कर्मचार्‍यांना चांगलेच वठणीवर आणले होते. त्याचप्रमाणे एक कंपनी म्हणून पीएमपीचे काम चालावे यासाठी  मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल त्यांनी केले. उशिरा येणार्‍यांचा खाडा, हेतुपुरस्सर बदली केलेल्या कर्मचार्‍यांची मूळ  ठिकाणी बदली, बेकायदेशीरपदोन्नती रद्द करणे, विविध मार्गांचे  सुसूत्रीकरण, बीआरटी सेवेला गती देणे, बसेसचे ब्रेकडाऊन कमी करणे, नवीन आस्थापना आराखडा  या महत्त्वाच्या बाबी मुंढे यांनी केल्या होत्या.

चांगले परिणाम दिसताहेत : मुंढे

शासनाने केलेल्या बदलीची आर्डर हाती मिळालेली आहे.  गुरुवारी पदभार सोडणार आहे, तर शुक्रवारी नाशिक येथे जाऊन  पदभार स्वीकारणार आहे. पीएमपीत 10  महिन्यांचा कालावधी मिळाला. त्या काळात अनेक बदल केले आहेत. त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. कर्मचारी शिस्त, ऑटोमेशन, मार्गांचे सुसूत्रीकरण  असे अनेक निर्णय घेतले. हे पुढे असेच सुरू राहिले तर पीएमपी निश्‍चितच उभारी घेण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली.
 

बैठकांना अनुपस्थिती 

पीएमपीच्या बसेसच्या संचालन तुटीसाठी मिळणारा निधी घेण्यासाठी मुंढे यांना पालिकेत येऊन बोलावे लागेल, अशी भूमिका नगरसेवकांनी  घेतली होती; मात्र मुंढे यांनी त्यास नकार दिला होता. कित्येकदा बैठकीसाठी बोलावूनही ते  कधीच उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे सत्ताधारी बहुतांशी नगरसेवक नाराज झाले होते.

सामान्यांचे नुकसान :  तुपे

तुकाराम मुंढे हे अधिकारी म्हणून खरोखरच चांगले होते; मात्र दुर्दैवाने सत्ताधारी  भाजपाला त्यांच्याकडून चांगले काम करून घेता आले नाही. भाजपाच्या खासदारांनीच त्यांना येथे आणले; मात्र त्यांच्याच पदाधिकार्‍यांनी हुसकावून लावले. त्यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया पुणे महानगरपालिकेतील  विरोधी पक्षनेता चेतन तुपे यांनी दिली. कामगार संघटनांना विश्‍वासत घेतले नाही तुकाराम मुंढे यांनी चांगले धोरणात्मक निर्णय घेतले; मात्र ते घेताना कामगार संघटनांना विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे कामगारांचे अतोनात नुकसान  झाले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील नलावडे यांनी दिली.

हुकूमशाही पद्धतीने काम 

पीएमपीचा कार्यभार घेण्यापूर्वी मुंढे हे अतिशय शिस्तीचे अधिकारी म्हणून चांगले वाटले होते; मात्र ते पुढे कामगारांशी हिटलरशाही पद्धतीने वागले.  अनेक चुकीचे निर्णय घेतले, अशी प्रतिक्रिया  पीएमपी कामगार मंचचे दिलीप मोहिते  यांनी दिली. मुंढे यांची बदली दुर्दैवी तुकाराम मुंढे हे संविधानाच्या चौकटीत राहून  आपले कर्तव्य बजाबत होते. त्यांच्या कामामुळे  राजकीय नेत्यांची दुकानदारी बंद पडली होती.  त्यामुळे खलबते करून मुंढे यांची बदली करण्यास मुख्यमंत्र्यांना भाग पाडले. मुंढे यांच्यासारख्या  कर्तव्यदक्ष अधिकार्‍याची बदली होणे ही पुणेकरांसाठी दुर्दैवी बाब आहे. अशी प्रतिक्रिया  संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतोष शिंदे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रवींद माळवदकर यांनी दिली. 

वादग्रस्त ठरलेले निर्णय : कर्मचारी

संघटनांचे कार्यालय खाली करणे, बस ठेकेदारांना दंड, नवीन आस्थापना आराखडा, कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस नाकारणे, नगरसेवक सिद्धार्थ  शिरोळे यांचे पीएमपीतील ऑफिस खाली करणे, पासेसच्या दरामध्ये वाढ, कर्मचार्‍यांना  महिन्यातून केवळ एकच रजा.

प्रस्तावित असलेले निर्णय:  

मिनी बसचा विस्तार, नवीन अ‍ॅटोमॅटिक बस खरेदी, प्रत्येक मिनिटाला मिनी बस, चालक व वाहकांना बस देण्यासाठी ,अ‍ॅटोमॅटिक यंत्रणा.