Tue, Jul 23, 2019 04:36होमपेज › Pune › तुकाराम मुंढे यांना राज्य सेवेत पाठवा

तुकाराम मुंढे यांना राज्य सेवेत पाठवा

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:47PMपिंपरी प्रतिनिधी

पीएमपी बस सेवा अधिक जलद करून सदर कंपनी नफ्यामध्ये आणण्याचे सोडून एकाधिकारशाही व मनमानी कारभार करीत असलेल्या पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना राज्य सेवेत परत पाठवावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे गुरुवारी केली आहे.

पीएमपीच्या कारभारात सुधारणा, प्रवाशांना सुरक्षित व जलद सेवा पुरविणे आणि रस्त्यावर जास्तीत जास्त संख्येने बस उतरवून कंपनी फायद्यात आणावी, या हेतूने राज्य शासनाने मुंढे यांची पीएमपीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली; मात्र ते कोणतीही खातरजमा न करता, कसलाही खुलासा न घेता किरकोळ कारणावरून त्यांना सेवेतून निलंबित आणि बडतर्फ करीत आहेत. काहींच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या केल्या. त्यामुळे पीएमपीचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. 

मुंढे अध्यक्ष झाल्यापासून अनेक मार्गांवरील बसफेर्‍या देखील बंद झाल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न घटले. पीएमपीला पिंपरी-चिंचवड महापालिका निधी देते. पीएमपीच्या कारभारात सुधारणेसह उपाययोजना करण्यासाठी मुंढे यांना पुणे व पिंपरी महापालिकेत चर्चेसाठी पाचारण केले असता ते एकदाही उपस्थित राहिले नाहीत; तसेच कामकाज सुधारणेसाठी काही सूचना केल्यास ते त्याची कोणतीही दखल घेत नाहीत, असे पवार यांनी निवेदनात म्हटले आहे. या  कारणांमुळे मुंढे यांना पुन्हा राज्य शासनाच्या सेवेत तातडीने वर्ग करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले की, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये याबाबत निर्णय घेतला जाईल.