Tue, Jul 16, 2019 09:51होमपेज › Pune › तुकोबा पालखीतील देवाचा अश्व देहूकडे

तुकोबा पालखीतील देवाचा अश्व देहूकडे

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 1:19AMबावडा : वार्ताहर 

जगद‍्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील देवाच्या स्वारीचा अश्व सध्या पंढरपूरहून देहूकडे प्रवासात असून, बावडा येथे बुधवारी (दि. 27) या अश्वाची पूजा करण्यात आली. देहू येथे हा अश्व दि. 5 जुलै रोजी सकाळी पोहोचणार आहे. 

या अश्वासोबत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार ह. भ.प. निवृत्ती महाराज गिराम (रा. पंढरपूर) हे आहेत. पंढरपूर येथून रविवारी (दि. 24) या अश्वाने माई दिंडीसमवेत देहूकडे जाण्यासाठी प्रस्थान केले. मंगळवारी (दि. 26) सराटी येथे मुक्काम केला. बुधवारी (दि. 27) रात्रीचा मुक्काम दगडे वस्ती, वरकुटे खुर्द येथे तर गुरुवारी (दि. 28) महादेव मंदिर, सणसर येथे अश्वाचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर करावागज (दि. 29), आंबी बुद्रुक (दि. 30), कुंभारवळण (दि. 1 जुलै), वाणवडी (दि. 2), विठ्ठल मंदिर भोसरी (दि. 3), चिखली (दि. 4) येथे मुक्काम करून पालखी प्रस्थानदिनी दि. 5 जुलैला सकाळी अश्व देहूत दाखल होईल, असे ह. भ.प. गिराम (चोपदार) यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील पेठ बाभुळगाव (ता. पाथरी) येथील विनायक रणे-पाटील यांचे मालकीचा हा देवाच्या स्वारीचा अश्व आहे. गोपाळकाला झाल्यानंतर हा अश्व पेठ बाभुळगावकडे रवाना होईल. अश्वस्वार म्हणून प्रकाश लाडाणे हे काम पाहत आहेत. बुधवारी सकाळी बावडा येथे माजी सैनिक जयवंत घाडगे व जयश्री घाडगे या उभयतांनी अश्वाची पूजा केली. या प्रसंगी गोरख घाडगे, मारुती घोगरे, दीपक शिंदे, कैलास घाडगे, किसन सूर्यवंशी, सूरज घाडगे उपस्थित होते.