Wed, Jul 17, 2019 20:13होमपेज › Pune › मुख्यमंत्र्यांचा पक्षांतर्गत ‘बॅलन्स’ ठेवण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांचा पक्षांतर्गत ‘बॅलन्स’ ठेवण्याचा प्रयत्न

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Jul 31 2018 11:38PMपिंपरी : जयंत जाधव

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांना व उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांना उमेदवारी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पक्षांतर्गत शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या गटात ‘बॅलन्स’ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शहरातील माळी समाजाबरोबरच लांडगे यांनाही खूश ठेवण्याची यशस्वी खेळी भाजपने केली आहे. विरोधी पक्षानेही या निवडणुकीत अर्ज दाखल केले असले तरी महापालिकेतील बहुमत पाहता भाजपचे उमेदवार विजयी होणार हे निश्‍चित आहे.    

महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेही अर्ज घेतले आहेत. दोन्ही पदासाठी प्रत्येकी 11 अर्ज नगर सचिव कार्यालयातून सोमवारी (दि.30) घेतले. महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) मंगळवारी (दि.31) दुपारी  भरण्यात आले. त्यासाठी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 4 अर्ज घेतले आहेत. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी या दोन्ही पदासाठी प्रत्येकी 4 अर्ज घेतले आहेत. तर, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी या दोन्ही पदासाठी प्रत्येकी 2 अर्ज घेतले आहेत. तसेच, भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी दोन्ही पदासाठी प्रत्येकी 1 अर्ज नेला आहे.

सत्ताधारी भाजपमध्ये शहराध्यक्ष आ. जगताप यांच्या गटाच्यावतीने शत्रुघ्न काटे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. सोमवारी मुंबईत वर्षा’वर जाऊन सुमारे 30 नगरेसवकांनी शक्तिप्रदर्शन केले. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या द‍ृष्टीने उपयुक्त व बहुजन समाजातील (कुणवी) इच्छुक उमेदवारास म्हणजेच काटे यांना संधी द्यावी,  अशी मागणी केली होती. परंतु; मुख्यमंत्री फडणवीस यांनी आलेल्या नगरसेवकांची बाजू ऐकून पक्षात अशाप्रकारे दबाव तंत्र आणून अथवा एखाद्या भागाचा किंवा जातीचा विचार करून उमेदवारी दिली जात नाही. पक्ष सांगेल तो उमेदवार निवडून येईल, असे सांगून कानउघडणी केली. 

भाजपमध्ये आ. लांडगे यांनीहीं माळी समाजाच्या संघटनांना पुढे करून माळी समाजातील राहुल जाधव अथवा संतोष लोंढे यांना उमेदवारी देण्याची मागणी करणारी पत्रकार परिषद घडवून आणली. त्यामुळे जोरदार माोर्चेबांधणीनंतर आ. जगताप गटाच्या शत्रुघ्न काटे यांना उमेदवारी न देता मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. लांडगे यांच्या पारड्यात झुकते माप टाकले. याला कारणही तसेच होते. स्थायी समिती अध्यक्षपदी ममता विनायक गायकवाड  यांची वर्णी लागली तेव्हाच हे निश्‍चित झाले होते की महापौरपद बदलल्यास ते आ. लांडगे यांच्या गटाला जाणार. आ. लांडगे यांनी पहिल्या सव्वा वर्षाकरिता कुणबी संवर्गातील नितीन काळजे यांची वर्णी लावल्याने त्यांना पुढील राजकारणासाठी माळी समाजातील उमेदवारालाच संधी द्यावी लागणार होती.     

शहर भाजपअंतर्गत आ. जगताप व आ. लांडगे यांच्याबरोबरच निष्ठावंतांचाही तिसरा गट आहे. निष्ठावंत गटातर्फे मागील वेळी ऐनवेळेस मागे पडलेले नगरसेवक नामदेव ढाके यांचेही नाव चर्चेत होते. परंतु; आगामी लोकसभा निवडणूक भाजपला शिवसेनेशी युती न करता लढवायची असेल तर मावळ लोकसभा मतदारसंघातून आ. लक्ष्मण जगताप व शिरुर लोकसभा मतदारसंघातून आ. महेश लांडगे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे भाजपला ‘एकला चलोरे’चा प्रयोग यशस्वी करावयाचा असेल तर आ. जगताप व आ. लांडगे यांना ताकद देणे व दोन्ही नेत्यांचे ऐकने भाग पडणार आहे. 

शहरातील सर्वच गटांना हाताळण्याचे मुख्यमंत्र्यांचे कसब 

एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात आ. जगताप, आ. लांडगे व भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भाजप सत्तेच्या वाटपाचा ‘बॅलन्स’ ठेवण्याचाही अटोकाट प्रयत्न करत आहे. त्यानुसारच महापौरपदी आ. लांडगे गटाचे राहुल जाधव व उपमहापौरपदी आ. जगताप गटाचे सचिन चिंचवडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या अगोदर स्थायी अध्यक्षपदासाठी आ. जगताप यांच्या ममता गायकवाड यांना संधी देत ‘स्थायी’चे सदस्यपद वाटपातही ‘बॅलन्स’ ठेवला आहे. तर चिंचवड येथील क्रांतिवर चापेकर बंधू यांच्या वस्तू संग्रहालयाच्या भूमिपूजन प्रसंगी ‘पानसरे यांना न्याय देऊ’, असे पानसरे समर्थकांना व अल्पसंख्याकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन देऊन एकूणच  पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपात सर्वांना खूश ठेवण्याचा ‘बॅलन्स’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्या तरी बरोबर राखला आहे.