Fri, Apr 26, 2019 09:38होमपेज › Pune › भगवतगिता, ज्ञानेश्‍वरी सोप्या भाषेत अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न : विनोद तावडे 

भगवतगिता, ज्ञानेश्‍वरी सोप्या भाषेत अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न : विनोद तावडे 

Published On: Aug 31 2018 10:08PM | Last Updated: Aug 31 2018 10:08PMपुणे : प्रतिनिधी 

संत साहित्यातील विज्ञाननिष्ठा सगळ्यासमोर आणणे आवश्यक आहे. संतसाहित्यातील जीवन मुल्ये आपल्या आचरणात उतरवणे, आजच्या काळाची गरज आहे. ही जीवनमुल्ये आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून पुढे कसे नेहता येतील याचा प्रयत्न सुरु आहे. शिक्षणमंत्री म्हणून शाळेच्या अभ्यासक्रमात भगवतगिता आणि ज्ञानेश्वरी सोप्या भाषेत कशी आणता येईल, याचा सातत्याने विचार करत आलो आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केले. 

संतसाहित्यात उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍यांना राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे दरवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शुक्रवारी अण्णा भाऊ साठे सभागृहात ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार २०१६-१७ ह.भ.प डॉ. किसन महाराज साखरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री पालकमंत्री गिरीष बापट, जेष्ठ संगणकतज्ञ विजय भटकर, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार योगेश टिळेकर, आमदार भीमराव तापकिर, आमदार माधुरी मिसाळ, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, रामकृष्ण महाराज लहवितकर आदी उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरुप पाच लाख रूपये रोख, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह असे होते.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. किसन महाराज साखरे म्हणाले, ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराच्या निवड समितीत यापूर्वी काम केले आहे. आता हा पुरस्कार मला मिळत आहे. हा पुरस्कार पुढच्या जीवनाला प्रोत्साहन देतो. मी वेदापासून संत वाडमयापर्यंत सार सांगण्याचे काम केले.  तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज ही महाराष्ट्राची दैवत आहे.. या समाजात दैवी संपत्ती नादावी असे वाटत असेल तर संस्कृत वाडमया बरोबर संत साहित्य शिकविण्याची गरज आहे, असेही साखरे महाराज यावेळी म्हणाले. 

कार्यक्रमाच्या सुरवातीला पंडिता मंजुषा पाटील आणि त्यांच्या टीमने अभंगरंग याअंतर्गत अवघे गरजे पंढरपूर, जय जय राम कृष्ण हरी, नामाचा गजर आदी विविध अभंगांचे गायन केले. तसेच रगुनाथ खंडाळकर यांनी संताचा अनुभव संतची जानते हा अभंग सादर केला. यावेळी बाल वारकर्‍यांनी साखरे यांच्या १०२ ग्रंथ डोक्यावर घेऊन वारी काढली.

पुरस्काराची रक्कम संस्कृतच्या शाळेसाठी परत... 

इंग्रजी कॉनव्हेंन्ट प्रमाणे संस्कृतची कॉनव्हेंन्ट सुरु करावी, अशी मागणी यावेळी किसन महाराज साखरे यांनी शिक्षणमंत्री तावडे यांना केली. त्यासाठी पुरस्काराची रक्कम पाच लाख आणि त्यामध्ये एक लाख जमा करुन असे सहा लाख रुपये त्यांनी यावेळी शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे सुपुर्त केली. याबाबत तावडे म्हणाले की, राज्याचे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुरू केले असून याच्या पहिल्या वर्गापासून संस्कृत विषय अनिवार्य करण्यात आला आहे.