Mon, Aug 19, 2019 04:56होमपेज › Pune › विरोध करणार्‍यांना केले जात आहे ट्रोल

विरोध करणार्‍यांना केले जात आहे ट्रोल

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या सायकल शेअरिंग योजनेवर आक्षेप घेणारे विरोधी पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवकांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंबंधीचे पुरावेच विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी गुरुवारी सभागृहात सादर केले.

महापालिकेकडून शहरासाठी सायकल शेअरिंग योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या धोरणाचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूरही झाला आहे. मात्र, या योजनेतील त्रुटी विरोधी पक्षांकडून सातत्याने चव्हाट्यावर आणल्या जात आहेत. त्यावर प्रशासनाकडून समाधानकारक खुलासा न होता ही योजना रेटून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. विरोधी पक्षांच्या आग्रही भूमिकेनंतर गुरुवारी या योजनेचे नगरसेवक आणि पत्रकारांसमोर सादरीकरण करण्यात आले.

या सादरीकरणानंतर नगरसेवक बागवे यांनी ही योजना मंजूर करून घेण्यासाठी कशा पद्धतीने ट्रोल केले जात आहे, याचे पुरावेच सभागृहात सादर केले. ते म्हणाले, की पुणे सायकल ग्रुप नावाचा एक ग्रुप आहे. त्यावर सायकल शेअरिंगला विरोध करणारे म्हणून खा. वंदना चव्हाण, चेतन तुपे, आबा बागूल यांची नावे व मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत. त्यांना मेसेज करा, फोन करा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधितांचे ही योजना कशी चांगली आहे आणि तिला पाठिंबा द्या अशा आशयाचे मेसेज सातत्याने वेगवेगळ्या नंबरवरून येत असल्याचे सांगितले.

विरोधी पक्षनेते तुपे यांनी आपल्याला अशाच पद्धतीने मेसेज येत असल्याचे सांगत, विरोध करणार्‍यांना अशा पद्धतीने ट्रोल केले जात असल्याने आता विरोध करण्याची भीती वाटू लागली असल्याचे सांगितले. तसेच या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही बागवे व तुपे यांनी केली. मात्र आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यावर खुलासा करण्याचे टाळले.