Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Pune › आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना घडवले पुणे दर्शन

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना घडवले पुणे दर्शन

Published On: May 17 2018 1:25AM | Last Updated: May 17 2018 12:05AMपुणे : प्रतिनिधी 

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम अशा आदिवासी भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शहरातील नवीन संधीची माहिती व्हावी, यासाठी अंघोळीची गोळी संस्थेद्वारे ‘मामाच्या गावाला जाऊ या’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पुणे दर्शन घडवण्यात येत आहे. ‘स्वप्न पहा आणि मोठे व्हा’ अशी काहीशी या वर्षीच्या कार्यक्रमाची थिम असून 11 मे ते 16 मे या दरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी या विद्यार्थ्यांना संस्थेद्वारे विविध शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घडवल्या. 

अंघोळीच्या गोळी संस्थेद्वारे मामाच्या गावाला जाऊया या उपक्रमाअंतर्गत अनाथ, गरीब, तसेच अनाथाश्रमात राहणार्‍या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत शहरात आणून विविध शैक्षणिक, सामाजिक, तसेच क्रीडा क्षेत्रातील संस्थाच्या भेटी घडवून आणून मान्यवरांचे मार्गदर्शन दिले जाते. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम अशा आदिवासी भागात राहणार्‍या 10 मुले आणि 10 मुली यांना शहरात आणण्यात आले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था विद्यार्थी सहायक समितीच्या मुलींच्या वसतीगृहात करण्यात आली होती. याविषयी बोलताना अंघोळीची गोळी संस्थेचे प्रमुख माधव पाटील म्हणाले, यावेळी आलेली मुले ही अकोले तालुक्यातील जवळपास 10 वेगवेगळ्या गावातील आहेत. 

या उपक्रमासाठी विद्यार्थी सहायक समिताचे प्रभाकर पाटील, मराठवाडा मित्र मंडळाचे भाऊसाहेब जाधव, ब्लेड्स ऑफ ग्लोरीचे रोहन पाटे, राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील अधिकारी वर्ग तसेच पेशवे पार्क दाखवण्यासाठी गणेश साळेगावकर, सागर वडके आणि अजय पवार यांचे सहकार्य मिळाले. गेल्या दोन दिवसांत मुलांना शनिवारवाडा, राजीव गांंधी प्राणी संग्रहालय, ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय आणि बालेवाडी क्रीडा संकुल दाखवले आहे. त्याचबरोबर मुलांना सिंहगड, लोणीकंद येथील राज कपूर स्टुडिओ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदी ठिकाणी भेट देऊन त्यांची माहिती दिली आहे. या उपक्रमासाठी अंघोळीच्या गोळी संस्थेचे माधव पाटील, रुपाली पाटील, नामदेव बांगर, शरद बोदगे, अमोल बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले.