Tue, Mar 19, 2019 20:38होमपेज › Pune › वृक्ष लागवड जोमात; वृक्षसंवर्धन मात्र कोमात

वृक्ष लागवड जोमात; वृक्षसंवर्धन मात्र कोमात

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 22 2018 11:21PMपुणे : सुनील जगताप

जागतिक तापमानामध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत गांभीर्याने घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनाचे विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत दि. 1 ते 7 जुलै 2017 दरम्यान शासनाने राज्यभरात 4 कोटी वृक्ष लागवडीचा मोठा उपक्रम राबविला. मात्र ही मोहीम राबवीत असताना वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष संवर्धनाची योजना नसल्याचे समोर आले आहे. वन विभागाच्या जागेवर झालेल्या वृक्ष लागवडीमध्ये 85 ते 90 टक्के वृक्ष जगले असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली असली तरी इतर ठिकाणच्या वृक्षांचा प्रश्‍न मात्र अधांतरीतच राहिला आहे.

महाराष्ट्र शासनाने हरित महाराष्ट्रासाठी आणि जमिनीची होणारी धूप थांबवण्यासाठी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत 2017 या प्रथम वर्षी शासनाने 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यासाठी आधीपासूनच विविध ठिकाणी जाहिराती अथवा इतर प्रचार साहित्याच्या माध्यमातून त्याचा प्रसारही केला. या प्रसारामध्ये 4 कोटीहून अधिक वृक्ष लागवड झाली असल्याचे वन विभागाचे अधिकारी सांगतात. मात्र या 4 कोटी वृक्षांपैकी किती वृक्ष जगले याबाबत अधिकृत माहिती पुढे येत नाही.

वृक्ष लागवड मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून तिसर्‍या टप्प्यात 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्याच्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेसाठी प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली असली तरी 4 कोटी वृक्षांच्या केलेल्या लागवडीबाबत माहिती मात्र उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. 

वन विभागाच्या जागेवर 4 कोटी वृक्ष लागवडीतील 85 ते 90 टक्के वृक्ष जिवंत असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु वृक्ष लागवडीची मोहीम वन विभागाची असून वृक्ष संवर्धनाची जबाबदारीही याच विभागाची आहे. फक्‍त स्वतःच्या विभागाव्यतिरिक्‍त इतर विभागांनी वृक्ष संवर्धन केले की नाही याची माहिती घेण्यात आलेली नाही. तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनीही यामध्ये सहभाग घेतला होता. परंतु त्यांच्याकडून वृक्ष संवर्धनाबाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने वृक्षारोपणाव्यतिरिक्‍त वृक्ष संवर्धनाचा प्रचार करण्याची गरज असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये सुरू आहे.

याबाबत वन विभागाचे उपवनसंरक्षक  रंगनाथ नाईकडे म्हणाले की, 2017 मध्ये वृक्ष लागवडीची जी मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये वन विभागाच्या जागेवर झालेल्या वृक्षारोपणामध्ये आतापर्यंत 85 ते 90 टक्के वृक्ष जिवंत असून त्याची निगा राखण्याचे काम आमचा विभाग करीत आहे. परंतु, इतर विभागांबाबत अद्यापही आमच्याकडे माहिती उपलब्ध झालेली नाही.