Thu, Aug 22, 2019 12:33होमपेज › Pune › हद्दीच्या वादात वृक्षांची ‘फरफट’

हद्दीच्या वादात वृक्षांची ‘फरफट’

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 20 2018 11:28PMपुणे : सुनिल जगताप

आपल्या प्रिय माणसांच्या स्मृती जगवण्यासाठी तयार करण्यात आलेले आणि संपूर्ण महाराष्ट्रात नावाजले गेलेले स्मृतिवन आता पुणे महापालिकेच्याच विस्मृतीत गेले आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी हे स्मृतिवन एका संस्थेच्या हद्दीत असल्याचे सांगत जबाबदारीही झटकली आहे; त्यामुळे या स्मृतिवनच्या हद्दीच्या वादात मात्र तेथील वृक्षांची ‘फरफट’ होत असल्याचे समोर आले आहे.

लोकसहभागातून वनीकरणात वाढ व्हावी म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2010 साली हा प्रकल्प सुरू केला. त्या वेळी महापालिकेने डहाणूकर टेकडी आणि गणपतीमाथा टेकडी येथे स्मृतिवन तयार केले. मात्र, सध्या या स्मृतिवनाकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. डहाणूकर कॉलनी येथील स्मृतिवनातील झाडे बरीच मोठी झाली आहेत. याशिवाय वनाच्या खालच्या भागात लोकवस्ती वाढल्याने पाण्याची कोणतीही सोय नाही.

गेल्या दोन वर्षांत तर उन्हाळ्यातही पाणी न दिल्याचे तेथील कर्मचार्‍यांनी सांगितले. गणपतीमाथा भागातील स्मृतिवन जवळपास कोमेजून गेले आहे. त्या ठिकाणी दोन झाडांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, झाडे वाळण्यास सुरुवात झाली आहे. इतकेच नाही तर शोभेसाठी लावण्यात आलेले गवतही वाळले असून, त्यांचीही काढणी झालेली नाही. मागील वर्षी खत व फवारणी करण्यात आली असली तरी यंदा त्यातील कणही टाकण्यात आलेला नाही. 

या स्मृतिवनाकडे उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले असून, कोणतीही निगा राखत नसल्याचे समोर आले आहे; त्यामुळे या स्मृतिवनामध्ये कोणीही फिरावयास येत नाही. या स्मृतिवनामध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लावलेल्या झाडाचाही समावेश आहे. दरम्यान, डहाणूकर कॉलनीतील स्मृतिवन गांधी भवनच्या जागेवर असून, मालकी हक्‍क त्यांचा असल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

दुसर्‍या बाजूला कोथरूड येथे असलेल्या उद्यानातील स्मृतिवनाच्या जागेवर भविष्यात मेट्रोचे स्टेशन आणि शिवसृष्टी साकारणार असल्याने तेथेही सध्या दुर्लक्ष झाल्याचे दिसून आलेले आहे. दरम्यान, या स्मृतिवनाची जबाबदारी महापालिकेने वन विभागाकडे दिल्यास तेथे होणारा राजकीय हस्तक्षेप, अतिक्रमण थांबवून सुशोभीकरण करण्यात येईल, अशी भूमिका वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घेतली असतानाही महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या उदासीन भूमिकेमुळे हे स्मृतिवन दुर्लक्षित होऊ लागले आहे. 

याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख प्रशांत वाघमारे म्हणाले की, डहाणूकर कॉलनीतील किर्लोस्कर कंपनीसमोर असलेले स्मृतिवन हे गांधी भवन या संस्थेच्या जागेत असून, त्या संस्थेची ही जबाबदारी आहे. तेथे महापालिकेचा संबंध नाही; तर कोथरूड येथे असलेल्या स्मृतिवनच्या जागेवर भविष्यात मेट्रोचे स्टेशन; तसेच शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येणार असल्याने त्याचे कामकाज थांबविण्यात आलेले आहे. इतर कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारचे स्मृतिवन महापालिकेच्या ताब्यात नाही.