Thu, Jul 18, 2019 16:34होमपेज › Pune › वृक्ष लागवड मोहिमेसाठी शासनाने कसली कंबर

वृक्ष लागवड मोहिमेसाठी शासनाने कसली कंबर

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 21 2018 11:58PMपुणे : सुनील जगताप

वैश्‍विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत गांभीर्याने घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टामध्ये सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी शासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध 26 विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून पुणे जिल्ह्याच्या पातळीवर मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शासनाच्या वृक्ष लागवडीच्या या मोहिमेमध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत पुणे जिल्ह्याने 55.91 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हाती घेतले असून जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली त्याचे नियोजनही सुरू करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील राज्य व केंद्र शासनाचे एकूण 26 विभाग सहभागी होणार आहेत. वन विभागांतर्गतही तीन भाग पाडण्यात आले असून पुणे विभागाला 10 लाख वृक्ष लागवड, जुन्नर वनविभागाला 10 लाख, तर भोर उपवन विभागामध्ये 5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. 

शासनाच्या इतर विभागांमध्ये कृषी विभागाला 5 लाख 7 हजार वृक्ष लागवड, नगरविकास विभागाला 1 लाख 56 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागाला 3 लाख 9 हजार, जलसंपदा विभागाला 1 लाख 8 हजार, शैक्षणिक संस्थांना 2 लाख 16 हजार, महसूल विभागाला 1 लाख 43 हजार, ग्रामविकास विभागाला 6 लाख 75 हजार यांसह इतर विभागांना जबाबदारी देण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागालाही 50 लाख 5 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून सर्व विभागांसह 55 लाख 91 हजार वृक्ष लागवड करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

या सर्व वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करीत असताना वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत 43 रोपवाटिकांमधून 60.01 लाख रोपे निर्मिती प्रस्तावित करण्यात आलेली असून याव्यतिरिक्त मागील वर्षातील 47.41 लाख रोपेही उपलब्ध आहेत. वृक्ष लागवड कार्यक्रमाकरिता ‘मग्रारोहयो’अंतर्गत 13 रोपवाटिकांमधून 18.42 लाख रोपे निर्मिती प्रस्स्तावित करण्यात आली आहे. 2018 सालच्या पावळ्यात वन विभागामार्फत 94 रोपवन स्थळांवर 3148.02 हेक्टर क्षेत्रावर 25.47 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात ग्रामविकास विभागामार्फत 1400 ग्रामपंचायती वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होणार असून त्याद्वारे 6.75 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तीनपट अधिक वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवण्यात आले असून सर्व विभागांचा सहभाग घेण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त स्वयंसेवी संस्था आणि काही नागरिकही पुढे येत असून 1 ते 7 जुलैदरम्यान ही वृक्ष लागवड मोहीम राज्यात मोठ्या प्रमाणात यश गाठेल असा विश्‍वास आहे. जिल्हास्तरीय वृक्ष लागवडीच्या नियोजनामध्ये शासनाचा एखादा विभाग राहिला असल्यास त्यांनाही या मोहिमेत समाविष्ट करून घेतले जाईल, असे वन विभागाचे उपवरसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले.