होमपेज › Pune › वृक्षारोपण झाले; वृक्षसंवर्धनाचे काय?

वृक्षारोपण झाले; वृक्षसंवर्धनाचे काय?

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 10:38PMपिंपरी : प्रतिनिधी

पर्यावरण संवर्धनासाठी शहरात विविध संस्था, तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने प्रयत्न होताना दिसून येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध भागात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. परंतु, या झाडांची सद्यःस्थिती पाहता  वृक्षारोपण झाले, आता वृक्षसंवर्धनाचे काय, असा सवाल नागरिक करत आहेत. 

मोहननगर चिंचवड परिसर तसेच केएसबी चौक परिसरात महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. परंतु सध्या या वृक्षांची अवस्था पाहता या झाडांकडे गेले कित्येक महिने लक्षच दिले गेले नाही अशी अवस्था आहे. या वृक्षांच्या संवर्धनाकडे प्रशासनाने पाठ फिरवलेली दिसत आहे. मोहननगर-केएसबी चौक परिसरात पालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र, आता ही झाडे दुर्लक्षित झाली असून गेली अनेक महिने या झाडांची काळजीच घेतली जात नसल्याचे दिसत आहे.

येथील वृक्षांची मोठी वाढ होऊनही लोखंडी जाळ्या काढण्यात आलेल्या नाही. त्यामुळे ही वृक्ष अस्ताव्यस्त वाढलेले आहेत. तसेच, नव्याने लावण्यात आलेल्या वृक्षांची बुडापासून छाटणी करण्यात आली आहे. या वृक्षांना त्यांची वाढ होईपर्यंत संरक्षण म्हणून  लोखंडी जाळी बसवावी लागते. मात्र,  अनेक ठिकाणी जाळी बसवलेली दिसत नाही किंवा वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. काही झाडे तर देखभालीअभावी तसेच पाणी न घातल्याने जळून गेले आहेत. सद्यःस्थितीत वृक्षलागवडीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये  वृक्ष लावलेले दिसत नाही.