Thu, Jun 20, 2019 21:19होमपेज › Pune › वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक ‘स्थायी समिती’पुढे येईना

वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक ‘स्थायी समिती’पुढे येईना

Published On: Feb 16 2018 1:51AM | Last Updated: Feb 15 2018 11:55PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

महापालिका वृक्ष प्राधिकरणाचे सन 2018-2019 चे अंदाजपत्रक डिसेंबरमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत मंजूर करण्यात आले; मात्र दोन महिने होऊन गेले, तरी हे अंदाजपत्रक महापालिका  स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवले गेलेले नाही. महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांच्या आडमुठेेेपणामुळे सदर अंदाजपत्रक लटकले असल्याची चर्चा आहे. 

महापालिका वृक्ष प्राधिकरणाचे  सन 2018-2019 चे 22 कोटी 61 लाख 56 हजार रुपयांचे अंदाजपत्रक मुख्य उद्यान अधीक्षक तथा वृक्ष अधिकारी सुरेश साळुंके यांनी वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत सादर केले. वृक्ष प्राधिकरणाच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या सभेत या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. अंदाजपत्रकात जमा बाजूस वृक्ष करातून साडेसात कोटी, बँक व्याजातून (अनामत रकमेवर) चार कोटी, रोपे विक्रीतून एक लाख, वृक्ष अनामत जप्तमधून 11 कोटी, तडजोड फीमधून (अनधिकृत वृक्षतोड दंड) पाच लाख दाखवले आहे.  

तर खर्च बाजूस स्थायी आस्थापनेसाठी चार कोटी, वृक्ष पुनर्रोपणासाठी वीस लाख, नर्सरी साहित्य खरेदीसाठी आठ लाख, खड्डे खोदाई व भराईसाठी एक कोटी 20 लाख, पिंजरे दुरुस्तीसाठी 15 लाख, पिंजरे खरेदीसाठी 35 लाख, वृक्षगणनेसाठी सहा कोटी, झाडे-रोपे, बी-बियाणे खरेदीसाठी 75 लाख, वृक्षसंवर्धन विभागाची विविध कामे करण्यासाठी 70 लाख, गायराने  व मोकळ्या जागेत वृक्षारोपणासाठी 50 लाख, रस्ते सुशोभीकरणासाठी दोन कोटी, दुर्गादेवी उद्यान देखभालीसाठी 50 लाख, टर्न की तत्त्वावर वृक्षारोपण व संवर्धनासाठी तीन कोटी, पाणीपुवठाविषयक कामांसाठी  30 लाख, अशी तरतूद आहे. वृक्ष प्राधिकरण समितीत  हे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर ते पालिका स्थायी समोर  ठेवून त्यास मंजुरी घेणे आवश्यक आहे; मात्र अद्यापही सदर अंदाजपत्रक स्थायीपुढे ठेवले नाही.  

याबाबत मुख्य उद्यान अधीक्षक तथा वृक्ष अधिकारी सुरेश साळुंके यांना विचारले असता ते म्हणाले की, हे अंदाजपत्रक मुख्य लेखापाल राजेश लांडे यांच्याकडे स्थायीसमोर  ठेवण्यासाठी पाठविले होते. ‘चर्चेसाठी बोलावले होते;  पण तुम्ही आला नाहीत,’ असे सांगत लांडे यांनी, ‘आता तुमचे तुम्ही पाहा,’ असे सांगितले. वास्तविक उद्यान अधीक्षक, वृक्ष पी. एम. गायकवाड  हे लांडे यांच्या कारकुनाने बोलावले असता त्यांच्याकडे तीन आठवड्यांपूर्वी गेले होते.

तेव्हाही त्यांना न भेटता ‘तुमचे तुम्ही पाहा,’ असे उत्तर दिले गेले. हे अंदाजपत्रक आता स्थायीपुढे कसे ठेवणार, असे विचारले असता साळुंके म्हणाले की, विषयपत्रावर स्वाक्षरी करावी, म्हणून आयुक्तांकडे फाईल ठेवली आहे. अतिरिक्त  आयुक्तांमार्फत ही फाईल आयुक्तांकडे जाते. प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी त्या फाईलवर ‘मुख्य लेखापाल राजेश लांडे यांना वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक स्थायी समितीपुढे  मांडण्याबाबत आयुक्तांनी सूचना कराव्यात,’ असा शेरा मारला आहे. त्यामुळे आयुक्तांची मान्यता घेऊन  सदर विषय स्थायी समितीसमेर ठेवण्यात येईल. 

मागासवर्गीय, क्रीडा, दिव्यांग योजना व भूसंपादनासाठी वाढीव निधी

यंदाच्या अर्थसंकल्पात मागासवर्गीय कल्याणकारी योजनेसाठी 5 टक्के म्हणजे 44 कोटी  रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मागील 28 कोटी 39 लाखांच्या तरतुदीपेक्षा ही रक्कम अधिक आहे. क्रीडासाठी एकूण 5 टक्के निधी दिला आहे. गेल्या वर्षी तो 10 कोटी 30 लाख होता, यंदा तो वाढवून 32 कोटी 60 लाख इतका केला आहे. दिव्यांग (अपंग) कल्याणकारी योजनेसाठी 16 कोटी 56 लाखांवरून 20 कोटी केली आहे. भूसंपादनासाठी 69 कोटींवरून 140 कोटींची भरीव तरतूद केली आहे. महिलांसाठी कल्याणकारी योजनेसाठी 48 कोटींवरून 33 कोटी अशी घटविली आहे.