Tue, Mar 19, 2019 09:16होमपेज › Pune › ट्रे -तिकीट मराठीतून, ई -तिकिटाला मात्र विलंब

ट्रे -तिकीट मराठीतून, ई -तिकिटाला मात्र विलंब

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 10:22PMपिंपरी : प्रतिनिधी

मनसेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पीएमपीएमएलच्या वतीने ट्रे तिकीट मराठीतून देण्यास सुरुवात करण्यात आली; मात्र ई-तिकीट मराठीतून देण्यास विलंब होत आहे. तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे विलंब होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ई -तिकीट प्रणालीसुद्धा मराठीतून सुरू करावी, अशी मागणी मनसेचे सचिव रुपेश पटेकर यांनी केली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सध्या ई-तिकीट मशिन व तिकीट ट्रे द्वारे तिकिटे दिली जात आहेत. या दोन यंत्रणेपैकी तिकीट ट्रे मधून दिली जाणारी तिकिटे मराठी भाषेतून दिली जात आहेत. ई-तिकीट यंत्रणा ही देशात फक्‍त पीएमपीएमएलने ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्याची प्रणाली सक्षमपणे राबवली आहे. सध्या बीआरटी व इतर मार्गावर आयटीएमएस यंत्रणेद्वारे प्रवाशांना बस व मार्गाची माहिती ऑनलाईन दिली जाते.

मोबाईल अ‍ॅपद्वारेही माहिती दिली जाते. ही माहिती ई-तिकीट मशिन प्रणालीशी संलग्न असणार आहे. आयटीएमएस यंत्रणा ही इंग्रजी भाषेमध्ये आहे. एकाच भाषेत ही प्रक्रिया असल्यामुळे मराठीमधून करताना अनेक आर्थिक व तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या यंत्रणा विकसीत करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यामुळे ही तिकिटे मराठीतून कधी सुरू होणार असा सवाल आहे.

शहरातील अनेक ठिकाणी फ्लेक्स, तिकिटे इंग्रजीतूनच दिली जात होती. या बाबत राज्य शासनाने नुकताच अध्यादेश काढला. त्यामध्ये नमूद करण्यात आले की, सर्व तिकिटे, स्थानिक संस्थांचा कारभार मराठीतूनच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीएमपीएमपीएलद्वारे तिकिटांचे वाटप इंग्रजीतून केले जात होते. 

मनसेच्या वतीने सतत पाठपुरावा केल्याने ही तिकिटे मराठीतून देण्यात येत आहेत; मात्र ई-तिकीट इंग्रजीतूनच दिले जात आहे. त्याबाबत पटेकर यांनी पीएमपीएमएलच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. या वेळी ही प्रणाली मराठीतून करण्यासाठी तांत्रिक व आर्थिक अडचणी मोठ्या असल्याचे सांगण्यात आले. त्वरित या अडचणी  सोडवून ई-तिकिटेही मराठीतूनच करा; अन्यथा ट्रे तिकिटाद्वारेच तिकिटांचे वाटप करण्याची मागणी रुपेश पटेकर यांनी केली आहे.