Mon, Jun 24, 2019 21:03होमपेज › Pune › बसमध्ये प्रवास करताय... सावधान!

बसमध्ये प्रवास करताय... सावधान!

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:40PMपिंपरी : संतोष शिंदे

खांद्यावर लहान मुले घेऊन बस प्रवासात चोर्‍या करणारी महिलांची टोळी शहरात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. बस प्रवासात होणार्‍या चोर्‍या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत त्यामुळे बसने प्रवास करताना सावध राहण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. 

बसचा प्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवास समजला जातो. परंतु अलीकडच्या काळात बसमधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. शहरातील मोठ्या संख्येने नागरिक पीएमपीएल बसने दररोज प्रवास करीत असतात. चाकरमान्यांसाठी तर बसचा प्रवास ही नित्याचीच बाब आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या प्रत्येक भागात बसमध्ये चोरी झाल्याच्या घटना प्रकर्षाने समोर येऊ लागल्या आहेत. या चोर्‍या करणारे मोठे रॅकेट शहरात कार्यरत आहे. 

बसमधील बहुतांश चोर्‍या या महिलांकडून केल्या जातात. त्या महिलांच्या कडेवर लहान मुले असल्याने त्यांच्यावर संशय घेतला जात नाही. या महिला प्रवाशांच्या खिशातील पाकीट, मोबाईल, गळ्यातील सोन्याचे दागिने अलगद काढून घेतात. या महिलांसोबत त्यांचे पुरुष साथीदारही बसमध्ये प्रवास करीत असतात. 

एखादे सावज हेरले की आपसात डोळ्याने इशारे करून त्या प्रवाशाभोवती गर्दी केली जाते. या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशाच्या किमती वस्तूंवर हात साफ केला जातो. एकदा काम फत्ते झाले की, लगेच पुढच्या बसथांब्यावर उतरून या महिला गल्लीबोळात गायब होतात.  

हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर या भागातून प्रवास करताना हात मारल्यास मोठे गभाड मिळत असल्याने या भागात अशा महिलांचा वावर वाढू लागला आहे. 

आयटीमध्ये काम करणार्‍या युवकांच्या पाकिटात चांगले पैसे असल्याने आयटी परिसरात देखील या महिला उघडपणे फिरत असल्याचे दिसून येते. या महिलांना हटकले असता आपण या परिसरात एखाद्या रुग्णालयात किंवा कामाच्या शोधात फिरत असल्याचे कारण पुढे केले जाते. डांगे चौक येथे एका तरुणाचे पाकीट मारत असताना त्या तरुणाने एका महिलेला रंगेहाथ पकडले होते. मात्र ती महिलाच आरडाओरडा करू लागल्याने घाबरून त्या तरुणाने महिलेला सोडून दिले. महिला असल्याने नसती झंजट अंगलट येण्याच्या भीतीने अनेकजण या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. 

बस पेट्रोलिंगची पुन्हा गरज

या चोर्‍या रोखण्यासाठी बसमध्ये तसेच बसथांब्यांवर पोलिस कर्मचारी तैनात करण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून शहरात ’बस पेट्रोलिंग’ नावाने एक उपक्रमदेखील सुरू करण्यात आला होता. मात्र, वरिष्ठ अधिकारी बदलताच त्यांचे उपक्रमही गुंडाळण्यात येतात त्याप्रमाणे बस पेट्रोलिंगदेखील काही काळानंतर बंद पडली. काही दिवसांपासून बसमध्ये होणार्‍या चोर्‍या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे आता बस पेट्रोलिंगची खरी गरज भासू लागली आहे.