Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Pune › शेतकर्‍यांच्या कष्टाला ‘वाटाणे’च

शेतकर्‍यांच्या कष्टाला ‘वाटाणे’च

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 24 2018 12:22AMपुणे : सुनील जगताप

लोणी काळभोर येथील एक शेतकरी... त्यांनी एक एकरात कांदापात लावली, अडीच महिन्याच्या कालावधीत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलेच, शिवाय बियाण्यापासून खते, औषधे, पाणी, मजूर आणि काढणीपर्यंच्या प्रवासात 50 हजारांवर खर्च केला. 16 हजार गड्डी पीक हाती आले. मोठ्या अपेक्षेने पुण्यात आल्यावर त्यांच्या हातात पडले केवळ 80 हजार. म्हणजे केवळ 5 रुपये गड्डी! पुढे आडत्याकडून किरकोळ विक्रेत्याला 10 रुपये गड्डी याप्रमाणे माल विकला गेला आणि किरकोळ विक्रेत्यांनी पुणेकरांना विकला 15 ते 20 रुपये गड्डी या भावाने...! शेतकर्‍याला मिळालेल्या भावापासून ग्राहकांच्या हातात पोहचेपर्यंतच्या प्रवासात 10 ते 15 रुपयांनी गड्डी ‘महाग’ झाली. शेतात राबणार्‍या हातांना खरेच योग्य मोबदला मिळाला का? हमाली, कर आणि हिशेेब इतकेच काम करून, आडत्यांचा खिसा विनासायास कसा भरला. नाशवंत मालाची जोखीम पत्करून, दिवसभर रस्त्यात माल विकणार्‍या किरकोळ विक्रेत्याला जास्त मोबदला मिळाला का, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘पुढारी’ने भाजीपाल्याचा शेतीपासून बाजारापर्यंतचा प्रवास जाणून घेतला आणि वस्तुस्थिती पुढे आणली.

पुण्याच्या पंचक्रोशीबरोबरच नगर, सातारा, कोल्हापूर येथून शेतमाल गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पुणे कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात येतो. इतर राज्यातूनही कांदा, बटाट्याचीही आवक होते. सरकारने शेतमाला हमीभाव जाहीर केला नसल्याने, अनेक शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र आहे. मुळातच  वाढत्या उन्हामुळे पालेभाज्या खराब झाल्या, उत्पन्न कमी आले आणि भाव नाही, अशी स्थिती आहे, परंतु तीच पालेभाजी दुप्पट दराने ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याचेही दिसून आले. 

8 रुपयांची कोथिंबीर 20 रुपयांना!

बाजारात सध्याच्या परिस्थितीत कोथिंबिरीला शेकड्याला 400 ते 1000 रुपये भाव मिळत असला, तरी शेतकर्‍यांना मात्र 300 ते 800 रुपये शेकडाच भाव मिळत आहे. याच कोथिंबीरची एक गड्डी  ग्राहकांपर्यंत 8 ते 20 रुपयांपर्यंत पोहचत आहे. शेतकर्‍याला कोथिंबीरच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतचा येणारा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

शेतकरी म्हणतो, आम्हाला भाव नाही 

सुरुवातीला उल्लेख केलेले लोणीकाळभोर येथील शेतकरी कांदापात उत्पादक अभिजित दुगाणे यांना दोन महिन्यांची राबणूक केल्यावर दिवसाला केवळ 400 रुपये मिळाले. ते म्हणाले, मार्चमध्ये पीक घेण्यास सुरुवात केली. मशागतीसाठी 5 हजार, बियाणांसाठी 10 हजार, खतांसाठी सुमारे 25 हजार, 5 हजाराची औषध फवारणी, खुरपणीसाठी 2 हजार, पाणी आणि इतर खर्च सुमारे 1 हजार असा एकूण सुमारे 50 हजार खर्च केला. 15 हजार रुपये खर्च करून मार्केट यार्डात माल गेला आणि हातात फक्त 80 हजार रुपये आले. माझ्या दररोजच्या कष्टाला फक्त 400 रुपये मिळाले. एवढ्या कमी मोबदल्यात उन्हातान्हात कोणी कष्ट  करेल का, असा सवाल करून दुगाणे यांनी शेतीमालाच्या सरकारी धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली. दररोज अत्यावश्यक असणार्‍या भाजीपाल्याचा हमीभाव ठरविण्याची गरज आहे, पण तो नसल्याने शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे.  

फसवणूक झाल्यास  हस्तक्षेप करू 

घाऊक बाजारात आलेल्या शेतमालाला मिळणारा बाजारभाव आणि ग्राहकांपर्यंत पोहोचल्यावर मिळणारा बाजारभाव यामध्ये खूप तफावत जाणवते, परंतु बाजार समिती म्हणून त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही, अशी सावध भूमिका पुणे कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी घेतली. एखाद्या शेतकर्‍याची फसवणूक झाल्यास त्याला न्याय मिळवून दिला जातो. शीतगृहामध्येही पालेभाज्या अथवा  कांदा खराब होत असल्याने ठेवता येत नाही. शेतकरी ते ग्राहकांमधील तफावतीदरम्यान वाढलेल्या दरावर अंकुश राहात नाही, परंतु त्यामध्ये बाजार समिती प्रशासन म्हणून काही हस्तक्षेप करता येत नाही. त्यावर  संबंधित शेतकरी आणि परवानाधारक व्यापारीच पुढाकार घेऊ शकतात, असे ते म्हणाले.