Wed, Aug 21, 2019 19:34होमपेज › Pune › ‘कचरा’ क्लीन चिटचा अहवाल कचर्‍यात

‘कचरा’ क्लीन चिटचा अहवाल कचर्‍यात

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 12:58AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग करून शहरातील घरोघरचा कचरा जमा करून तो मोशी कचरा डेपोत वाहून नेण्याचा कामाचा ठेक्याचा दर योग्य असल्याचे ‘पीपीपी’ तज्ज्ञ अजय सक्सेना यांचा अहवाल स्थायी समितीने फेटाळून लावला. या पूर्वीच संबंधित ठेका रद्द केला असून, त्याबाबतचा अहवाल ऐनवेळी समितीसमोर आणून आडमुठेपणा करणार्‍या पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर समितीने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

समितीच्या बुधवारी (दि. 2) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. घरोघराचा कचरा संकलन व वाहतुकीच्या ठेक्यास सीमा सावळे याच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीने 21 फेब्रुवारीला मान्यता दिली होती. हे काम ए. जी. इन्व्हायरो इन्फ्रा आणि बीव्हीजी इंडिया या दोन कंपन्यांस प्रत्येक वर्षी 56 लाख रुपये खर्चाने मंजूर केला होता. एकूण आठ वर्षांसाठी सुमारे 450 कोटी रुपये खर्च होता. सदर निविदा प्रक्रियेत अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदारांनी ‘रिंग’ केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. गटनेत्यांच्या 9 एप्रिलला झालेल्या बैठकीतही विरोधकांनी सदर ठेका रद्द करण्याचा आग्रह धरला होता. त्याची दखल घेऊन 11 एप्रिला सदर ठेक्याच रद्द करण्याचा निर्णय समितीने घेतला. त्याऐवजी सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयानुसार नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्याचा ठराव समितीने केला. दरम्यान, रद्द झालेल्या ठेक्याबाबत तज्ज्ञ सक्सेना याचा अहवाल पालिकेस प्राप्त झाला. अहवालानुसार संबंधित कामाचे दर योग्य असल्याचे म्हटले आहे. हा क्‍लीन चिटचा अहवाल प्रशासनाने ऐनवेळ समितीसमोर सादर केला.

त्यासंदर्भात समिती अध्यक्षा गायकवाड व सदस्य विलास मडिगेरी यांनी शंका उपस्थित केली. सदर अहवाल समितीसमोर सादर करण्याचे प्रयोजन काय, असे सवाल त्यांनी केला. अहवाल अवलोकनासाठी समितीसमोर मांडला असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उत्तर दिले. सदर अहवाल राज्य शासनाचा नसून, सक्सेना हे शासनाने नियुक्त केलेले तज्ज्ञ नाहीत. शासनाचे कोणतेही पत्र सदर अहवालासोबत नाही. त्यामुळे समितीने सदर अहवाल फेटाळून लावला. त्या कृतीतून समितीने प्रशासनाला आडमुठेपणास लगाम घातला आहे.  तसेच, मागील समितीने घेतलेले निर्णय कचर्‍यात टाकण्याचा ठाम निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये गटबाजी असल्याचे स्पष्ट होत आहे. 

Tags : Pimpri, Trash, Chit, Report,  Trash