Tue, Mar 19, 2019 12:13होमपेज › Pune › कर्कश हॉर्न विक्रेत्यांवर वाहतूक विभाग करणार कारवाई

कर्कश हॉर्न विक्रेत्यांवर वाहतूक विभाग करणार कारवाई

Published On: Sep 01 2018 10:28PM | Last Updated: Sep 01 2018 10:01PMपुणे : प्रतिनिधी 

मोठ्या आवाजातील हॉर्नची विक्री करणाऱ्या हॉर्न विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली आहे. तर, वाहन चालविताना वाहनांच्या सायलेंन्सर यंत्रणेत बदल करुन फटाक्‍यासारखा आवाज काढणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. 

मोठमोठ्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजामुळे इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तर, वाहन चालविताना वाहनांच्या सायलेंन्सर यंत्रणेत बदल करुन फटाक्‍यासारखा आवाज काढण्यात येतो. अशा वाहनांमध्ये बुलेटचे प्रमाण जास्त आहे. यावर बंदी असतानाही  कर्कश हॉर्न वाजविले जात आहेत. विशेषता रुग्णालय, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात कर्कश हॉर्न वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, मोठ्या आवाजात हॉर्न, मल्टीसाऊंड हॉर्न वाजवित जाणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरातील प्रदुषणात वाढ झाली आहे. 

काही वेळा कर्कश हॉर्न वाजविणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई होते, मात्र हॉर्न उत्पादक आणि विक्रेते यापासून दुर राहतात. मात्र, आता वाहतूक पोलिसांकडून अशा विक्रेत्यांचा शोध घेण्यात येणार असुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात सुरु असलेल्या कारवाईमध्ये कर्णकर्कश हॉर्नची कारवाई केली जात आहेत. कारवाईत वाहनचालकांना पकडून हॉर्न बसवून आणलेल्या ठिकाणाची माहिती घेण्यात येत आहे. यानंतर संबंधीत विक्रेत्याला नोटीस देऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त सातपूते यांनी सांगितले.