Thu, May 23, 2019 04:50होमपेज › Pune › सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी कामकाज व्हावे

सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी कामकाज व्हावे

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 1:06AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेने बांधलेली विस्तारित इमारत ब्युटीफुल असून  यामध्ये ड्युटीफुल काम होणे अपेक्षित आहे. या स्मार्ट सभागृहातून  स्मार्ट आणि जनहिताचे निर्णय व्हावेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण कामकाज व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मनपा आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते. 

नायडु म्हणाले, देशातील अनेक शहरांमध्ये मी जावून आलो पण असे सुंदर आणि देखणे सभागृह कुठेही पाहायला मिळाले नाही. पुणे शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. यातील सर्व योजनांच्या कामात पारदर्शीपणा आणि उत्तरदायित्त्व जोपासण्याची गरज आहे. स्मार्ट ब्युटीज बरोबर स्मार्ट ड्युटीची आवश्यकता आहे. सरकार सर्व काही करेल आणि आम्ही काहीच करणार नाही ही प्रवृत्ती चांगली नाही. महापालिकांनी केवळ केंद्राच्या निधीवर अवलंबून न राहता स्वत:चे आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याची गरज आहे. नागरिकांना ऑनलाईन सुविधा पुरविण्याच्या प्रयत्न केला जावा. तसेच रस्ते नद्यांवरील अतिक्रमणे दूर करण्याची गरज आहे, त्यात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये, तसेच नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जावू नये. यासाठी जनजागृती करावी, अशी अपेक्षाही नायडु यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, शारीरिक श्रमाअभावी आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत, त्यासाठी सायकल ट्रॅकची आणि फुटपाथची आवश्यकता आहे. शहरात सहकुंटुंबाला घेऊन फिरता येईल अशा नो व्हेईकल झोनची आवश्यकता आहे. आरोग्य हिच संपत्ती असल्याचे सांगत महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पवारांची अनुपस्थिती अन चर्चा

नवीन इमारतीच्या समारंभाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, पवार या समारंभाला अनुपस्थित राहिले, त्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू होत्या.