Wed, Aug 21, 2019 20:08होमपेज › Pune › पिंपळे सौदागर स्मशानभूमीचा कायापालट

पिंपळे सौदागर स्मशानभूमीचा कायापालट

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 12 2018 10:42PM

बुकमार्क करा
पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

या जगात  जन्म घेतलेल्या प्रत्येक मनुष्यास एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावेच लागते. त्यामुळे स्मशनभूमी ही प्रत्येक शहराची, गावाची गरज बनली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपळे सौदागर येथील स्मशानभूमीचा कायापालट घडवून आणला आहे. एकेकाळी पत्र्याच्या शेडमध्ये असलेली ही स्मशानभूमी आज देखणी, चकाचक बनली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 21 लाखांवर पोचली आहे. शहरात निगडीत अमरधाम, भोसरी सहल केंद्राशेजारी, पिंपरी गाव, डिलक्स, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, पिंपळे सौदागर, लिंक रोड, अशा अनेक ठिकाणी स्मशानभूमी आहेत. तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांच्या कार्यकाळात शहरातील स्मशानभूमी सुधारणांसाठी अधिकारी, पदाधिकार्‍यांनी नागपूरची गंगाबाई घाट स्मशानभूमी, सातारा शहरातील माहुली स्मशानभूमी पाहण्यासाठी अभ्यासदौरे केले. या दौर्‍यांना बराच काळ लोटल्यावर हळूहळू आपल्या शहरातही नागपूर, माहुलीच्या धर्तीवर सुंदर स्मशानभूमी असावी यासाठी प्रयत्न सुरू झाले.  पिंपळे सौदागर येथील स्मशानभूमीची सुधारणा तीन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आली. दोन टप्प्यांत हे काम करण्यात आले. 

पूर्वीची अग्निकुंडे ग्राउंड पातळीत होती, ती दोन फूट वर घेऊन दोन अग्निकुंडांना कास्ट आयर्नच्या जाळ्या लावण्यात आल्या, तर दोन अग्निकुंडे खड्डा पद्धतीची ठेवण्यात आली. जुन्या स्मशानभूमीला पत्र्याची शेड होती. नूतनीकरण करताना आरसीसी डोम करण्यात आला. अ‍ॅम्फी थिएटर उभारण्यात आले. अंत्यविधी सुरू असताना किमान तीनशे लोक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली. दशक्रिया विधीच्या वेळी हल्ली महाराजांची कीर्तने आयोजित केली जातात, हे लक्षात घेऊन दशक्रियेसाठी वेगळी शेड उभारण्यात आली. स्त्री व पुरुषांसाठी प्रत्येकी एक टॉयलेट व बाथरूमची सोय, पुरुषांना केस कापून आल्यावर अंघोळीसाठी शॉवर, आदी सुविधा केल्या आहेत. 

घाटाला टाईल्स, पेव्िंहग ब्लॉक सह फ्लॉवर बेड तयार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे स्मशानभूमीचे सौंदर्य अधिक खुलले आहे. अ‍ॅम्पी थिएटरमागे असलेल्या जागेचे सपाटीकरण व डांबरीकरण करून तेथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यात विद्युतदाहिनी अथवा सीएनजीदाहिनी सुविधा करण्यासाठी जागा सोडण्यात आली आहे. या सुविधा झाल्यानंतर पिंपळे सौंदागरची स्मशानभूमी शहरातील एक अद्ययावत स्मशानभूमी म्हणून ओळखली जाणार आहे.