Sat, Jul 20, 2019 02:19होमपेज › Pune › ट्रान्सफॉर्मर स्फोटातील जखमी तरुण, तरुणी अखेर मृत्युमुखी

ट्रान्सफॉर्मर स्फोटातील जखमी तरुण, तरुणी अखेर मृत्युमुखी

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 1:24AMपुणे : प्रतिनिधी

खराडी येथील झेन्सार आयटी पार्कसमोरील महावितरण खांबावरील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन, गंभीर जखमी झालेल्या आयटी कंपनीतील पंकज कृष्णाराव खुणे (26, वर्धा) व प्रियंका अनंतराव झगडे (24, सातारा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

ही घटना दि. 11 मे रोजी दुपारी घडली होती. यात तरुणी 20 टक्के तर तरुण 60 टक्के भाजला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी तरुणीचा  तर,  आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तरुणाचा मृत्यू झाला.

खराडी येथील झेन्सार आयटी पार्कसमोरील फुटपाथजवळ महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरशेजारी स्टॉल आणि चहाची टपर्‍या आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांची वर्दळ असते. घटनेच्या दिवशी  प्रियंका व पंकज हे दोघेही चहा पिण्यासाठी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास टपरीवर आले होते. ते परत जात असताना ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला आणि प्रियंका आणि पंकज यांच्या अंगावर ट्रान्सफॉर्मरमधील गरम ऑईल उडाल्याने दोघेही  गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर नागरिकांनी या दोघांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. एक महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान प्रियंका हिचा शनिवारी तर, पंकज याचा आदल्या दिवशी शुक्रवारी मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  

उपचाराचा खर्च परवडत नसल्याने पंकजचे कुटुंबीय  त्याला घरी घेऊन गेले होते. दोघेही झेन्सार आयटी पार्कमध्ये  बँक ऑफ महाराष्ट्राचे टेक्नीकल काम पाहणार्‍या ट्रायमॅक्स या कंपनीत काम करत होते.  घटनेच्या दिवसी महावितरणकडून याठिकाणी खोदकाम करून काम सुरू होते. काम सुरू असताना दुपारी स्फोट झालेल्या ट्रान्सफार्मरमध्ये प्रथम ठिणगी उडाली होती. त्यावेळी काम करणार्‍यांनी हा ट्रान्सफार्मर बंद केला आणि परत त्यांचे काम सुरू केल्याचे स्थानिक नागरिकांकडून अग्निशामक दलाला सांगण्यात आले होते. तर, स्फोट ट्रान्सफॉर्मरमध्येच झाल्याचेही नागरिकांनी म्हटले होते. 

संबंधितांवर कारवाई करू 

पदपथावर असलेल्या खाद्यापदार्थ विक्रीच्या स्टॉलला आग लागून दुर्घटना घडल्याचा अहवाल महावितरणकडून देण्यात आला आहे. याबाबत विद्युत निरीक्षकांनी दिलेल्या अहवालाची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर दुर्घटनेस जबाबदार असणार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल,असे चंदनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेेंद्र मुळीक यांनी सांगितले.