Fri, Jul 19, 2019 22:06होमपेज › Pune › वसुलीपथकात ट्रॅफिक वॉर्डन, होमगार्डही?

वसुलीपथकात ट्रॅफिक वॉर्डन, होमगार्डही?

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 11:01PMचाकण : वार्ताहर

औद्योगिक वसाहतीमुळे चाकण परिसरात गर्दी वाढली आहे. अशा वेळी वाहतूक नियमण-नियंत्रणासाठी पोलिसांना मदतनीस म्हणून दिलेले ट्रॅफिक वॉर्डन आणि होमगार्डसुद्धा आता वाहतूक नियंत्रणाऐवजी वसुलीपथकात सामील झाल्याचे धक्‍कादायक चित्र चाकण परिसरात बघायला मिळत आहे.विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव, फोफावलेली अवैध प्रवासी वाहतूक आणि बेशिस्त चालकांमुळे चाकण परिसरात सर्वच मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तरीही पोलिस यंत्रणा वाहतूक नियंत्रण-नियमनाऐवजी वसुली करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे.पोलिस प्रशासनाकडून मनुष्यबळाअभावी वाहतूक नियमनासाठी ट्रॅफिक वॉर्डन आणि होमगार्ड नेमण्याचे ठरविले गेले. त्यानुसार अनेक ठिकाणी ट्राफिक वॉर्डन व होमगार्ड नेमलेही गेले. यातील बरीच मंडळी अत्यंत सचोटीने व इमाने इतबारे वाहतूक नियंत्रणाचे काम पार पाडत आहेत; मात्र 

काही होमगार्ड आणि ट्राफिक 

वॉर्डन वाहतूक नियमन सोडून स्वतः दंड वसुलीच्या कामात व्यस्त राहत असल्याचे धक्कादायक चित्र चाकण परिसरात दिसत आहे.कारवाईच्या नावाखाली शंभर ते दोनशे रुपयांचा दंड आकारण्याची जणू स्पर्धाच ट्राफिक वार्डन आणि होमगार्ड यांच्यात सुरू असल्याचे चित्र पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौक, आळंदी फाटा, चाकण तळेगाव रस्ता, एमआयडीसी परिसर, महाळुंगे आदी भागात दिसत आहे. वसुलीच्या या कामात संबंधितांना नेमके कुणाचे पाठबळ आहे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

वसुलीचा ससेमिरा नको...

रहदारीचे नियमन, अपघातांना प्रतिबंध, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती करणे आदी कामे होमगार्ड आणि ट्रॅफिक वार्डने करणे अपेक्षित आहे. पोलिसांनी चोरीची वाहने शोधण्यासाठी कागदपत्रे तपासणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांना दंड केलाच पाहिजे. मात्र, अधिकार नसताना होमगार्ड आणि ट्रॅफिक वार्डनने दंड वसुलीचा ससेमिरा लावू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्‍त करीत आहेत.