Mon, Aug 19, 2019 06:56होमपेज › Pune › पिंपरीत एकेरी वाहतुकीचे तीन तेरा

पिंपरीत एकेरी वाहतुकीचे तीन तेरा

Published On: Mar 21 2018 2:10AM | Last Updated: Mar 21 2018 1:23AMपिंपरी : प्रतिनिधी

शहरात अनेक ठिकाणी ‘नो-एन्ट्री’चे फलक असतानाही बेशिस्त वाहनचालक वाहतूक नियम धाब्यावर बसवून, ‘नो-एन्ट्री’मधून प्रवास करत आहेत. या यामुळे ‘नो-एन्ट्री’तून वाहनधारक सर्रास वाहने चालवत आहेत. यामुळे अनेकदा समोरासमोर वाहने येऊन उभी टाकत असल्याने एकेरी मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक पोलिसांनी या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

चिंचवड स्टेशन, खराळवाडीजवळ, ‘एचए’ कंपनी परिसर, डेअरी फार्मजवळ, वल्लभनगर भुयारी मार्ग, पिंपरी उड्डाणपूल आदी परिसरात ‘नो-एन्ट्री’तून वाहनचालक मुजोरपणे वाहने चालवत असल्याचे चित्र आहे. भुयारी मार्गांमध्येही या बेशिस्त वाहनधारकांचे बेशिस्त प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे या वाहनधारकांमुळे वाहतूक नियम पाळणार्‍यांना मात्र त्रास होत असून, जीव मुठीत धरूनच वाहने चालवावी लागत आहेत. वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिक करत आहेत. 

रस्त्यांवर वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील विविध मार्गावर एकेरी वाहतुकीचा निर्णय घेण्यात आला. अगदी सुरुवातीला एकेरी वाहतूक सुरळीत चालली;  मात्र त्यानंतर  कोंडीची परीस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे; परंतु काही ठिकाणी वाहतूक पोलिसच उपस्थित राहत नसल्याने ‘नो-एन्ट्री’तून आता राजरोस वाहने जात आहेत. त्यामुळे आता एकेरी मार्गावरही वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली आहे. 

शहरातील कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे एकेरी वाहतुकीचा प्रयोगही फसला आहे; पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे एकेरी वाहतूक नागरिकांना 
अंगवळणी पडेनाशी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे व एकेरी वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

Tags : pune, pune news, Traffic police, worried, about, type,