Tue, May 21, 2019 00:31होमपेज › Pune › वाहतूक पोलिसांची कारवाई; चालकांची वादावादी

वाहतूक पोलिसांची कारवाई; चालकांची वादावादी

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 12:29AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला की, वाहनचालकांशी वाद ठरलेलेच. गुरुवारी (दि. 7) सकाळी पिंपरीतील इंदिरा गांधी पुलावर झालेल्या कारवाईदरम्यान वाहनचालकांच्या वादावादीला पोलिस निरीक्षकांना सामोरे जावे लागले. हेल्मेट आणि चुकीच्या मार्गिकेवरून वाहन चालवणार्‍यांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली.

पिंपरी चौक ते शगुन चौकदरम्यान वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. गुरूवारी दिवसभरात 33 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वेळी हेल्मेट परिधान न करणार्‍या दुचाकीस्वारांवरही कारवाई केली. या कारवाईला दुचाकी चालकांनी तीव्र विरोध करीत पोलिसांशी वाद घालता.पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे. वाहन चालकांमध्ये जनजागृती करूनही अनेक जण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. अशा बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांच्या वतीने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार गुरुवारपासून पिंपरी-चिंचवड शहरातील ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरवात करण्यात आली आहे.

पिंपरी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पुलावर मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरवात झाली. निंबाळकर कारवाई करत असताना एका वाहनचालकाने त्यांच्याशी चांगलाच वाद घातला. सर्वांवर कारवाई करा मगच माझ्यावर कारवाई करा, असा हेका या वाहनचालकाने निंबाळकर यांच्याकडे धरला होता. यामध्ये नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट परिधान न करणे, दुचाकीवरून ट्रीपल सीट जाणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, आदी वाहतुकीच्या नियमभंगप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून कारवाई झाली आहे.