Mon, Jul 22, 2019 02:37होमपेज › Pune › पिंपरी, मोरवाडीतील वाहतूक कोंडीत भर

पिंपरी, मोरवाडीतील वाहतूक कोंडीत भर

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 22 2018 10:56PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी ते चिंचवडच्या एम्पायर इस्टेट पुलापर्यंत पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. या कामांमुळे सर्व्हिस रस्ता अरूंद होऊन आणि रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहने व रिक्षामुळे अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, पिंपरी व मोरवाडी येथील सर्व्हिस रस्ता अरूंद होऊन वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अधिकचा रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून चक्क पदपथ काढून टाकण्यात येत आहे.  

पुणे मेट्रोची मार्गिका खराळवाडीतील ग्रेडसेपरेटरमधून पिंपरी चौकात वळण घेत आहेत. सर्व्हिस रस्त्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, मोरवाडी चौक अशी चिंचवडच्या एम्पायर पुलापर्यंत जाणार आहे. बीआरटीएसच्या लोखंडी बॅरीकेटसच्या बाहेरून मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम सुरू झाले आहे. मेट्रोने लोखंडी पत्रे लावून अर्धा सर्व्हिस रस्ता अडविला आहे. त्यामुळे पिंपरी चौक, मोरवाडी चौक, सेंट्रल मॉल, एम्पायर पुल या ठिकाणी सर्व्हिस रस्ता अधिक अरूंद झाला आहे. या मार्गावरील पदपथ व रस्त्यावर वाहने लावली जात असल्याने वाहनांसाठी रस्ता अपुरा पडत आहे. 

एम्पायर पूल ते मोरवाडी चौकापर्यंत असलेल्या शॉपींग मॉलमध्ये येणार्‍या नागरिकांची वाहने, गॅरेजवरील दुरुस्तीचे वाहने आणि हॉटेलमधील ग्राहकांची वाहने सर्रासपणे पदपथ व रस्त्यावर लावली जात आहेत. पालिका भवनासमोरील सर्व्हिस रस्त्यावर दोन्ही बाजूस बिनदिक्कतपणे मोटारी लावल्या जातात. पिंपरी चौकात बस थांबा आणि डॉ. आंबेडकर पुतळाच्या सीमा भिंतीभोवती असंख्य रिक्षा थांबलेल्या बेशिस्तपणे उभ्या असतात.  त्या जोडीला मोटारीही असतात. पिंपरी चौकातून खराळावाडीच्या दिशेने जाताना रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटारी, चायनीज स्टॉल, गॅरेज, स्पेअर पार्ट विक्री दुकाने, हॉटेल आदींमुळे रस्ता अरूंद झाला आहे. वाहन चालविणे अवघड होऊन बसले आहे. पदपथावरही वाहने लावली जात असल्याने नागरिकांना पायी चालताना कसरत करावी लागते. 

यामुळे वर्दळीच्या वेळेत एम्पायर पुल ते खराळवाडीपर्यंतच्या सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी अर्ध्या तासांपेक्षा अधिक वेळ जात आहे. वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मार्गावर नियमबाह्यपणे होणारे पार्किंग बंद करावे. पदपथ रिकामे करावेत. वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांसह वॉर्डनची नेमणूक केली जावी, अशा मागण्या त्रस्त नागरिक करीत आहेत.  

मेट्रो व पोलिसांच्या उपाययोजना

पिंपरी ते चिंचवडच्या एम्पायर पुलापर्यंत सर्व्हिस रस्त्यावरून मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. बीआरटीएस बॅरिकेटस बाहेरून पिलर उभारणीसाठी सुरक्षतेच्या दृष्टीने लोखंडी बॅरिकेटस उभारले आहेत. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून पदपथ हटवून काँक्रिटीकरण केले आहे. रस्त्यावर रिक्षा व इतर वाहने पार्क करू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी दक्षता घ्यावी म्हणून सूचना दिल्या आहेत. वर्दळीचा चौकात मेट्रोने प्रत्येकी 2 वॉर्डन नियुक्त केले असून,  ते वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत आहेत. या मार्गावर ‘नो पार्किंग झोन’ करावा आणि ग्रेडसेपरेटमधील ‘मर्ज इन’ व ‘मर्ज आऊट’ बदलण्याबाबत वाहतूक पोलिसांबाबत चर्चा सुरू आहे, असे पुणे मेट्रोच्या रिच वनचे प्रकल्प मुख्य व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले.