Mon, Mar 25, 2019 13:37होमपेज › Pune › नाशिक फाटा चौकात वाहतूक कोंडी

नाशिक फाटा चौकात वाहतूक कोंडी

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:13PMपिंपरी : प्रतिनिधी

कासारवाडीतील नाशिक फाटा चौक आणि परिसराला दुकानदारांनी गराडा घातला आहे. बेशिस्तपणे वाहने रस्त्यावर थांबत असल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. पुणे मेट्रोचे काम सुरू झाल्याने या कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. असे असूनही वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. परिणामी वाहनचालक वैतागले आहेत.

नाशिक फाटा चौक परिसरात चारही बाजूने जुनी मोटार वाहने आणि स्पेअर पार्ट विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे थेट रस्त्यावर मोटारी उभ्या केल्या जातात. मोटारीचे दुहेरी पार्किंग करून बिनदिक्कतपणे कामे केली जातात. तसेच, बेशिस्तपणे रिक्षा थांबविल्या जात आहेत. त्याचबरोबर खासगी ट्रॅव्हलसच्या बसेसही या रस्त्यावर उभ्या असतात. बसमध्ये  प्रवासी भरण्यासाठी या बसेस थेट रस्त्यावर उभ्या असतात. तसेच, हॉटेल, खाद्यपदार्थ व चहाचे स्टॉलही येथे मोठ्या संख्येने आहेत. या ठिकाणी येणार्‍या ग्राहकांची वाहनेही रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केली जातात. ही परिस्थिती या परिसरात बाराही महिने कायम आहे.

महामेट्रोचे कासारवाडी आणि नाशिक फाटा चौकातून शंकरवाडीच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर काम सुरू आहे. त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच, पावसामुळे शंकरवाडी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अशी स्थिती असतानाही, वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याची ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत. पिंपरीहून दापोडीच्या दिशेने जाताना मार्गावर असंख्य वाहने तसेच अवजड वाहने अचानक पिंपरीच्या दिशेने वळण घेत असल्याने कोंडीत भर पडत आहे. 

दरम्यान, सकाळच्या सुमारास वाहतूक पोलिस हजर असतात. मात्र, ते वाहतूक नियंत्रण सोडून आडोशाला थांबून पावत्या फाडण्यात व्यस्त असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न ‘जैसे थे’ आहे. परिसरातील मोटार व स्पेअर पार्ट दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, टपरीधारक, विक्रेत्यांवर कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी त्रस्त वाहनचालकांकडून केली जात आहे. 

पोलिस, पालिका, मेट्रो झटकत आहेत आपली जबाबदारी 

मनुष्यबळ कमी असल्याचे उत्तर वाहतूक पोलिस विभागाकडून दिले जात आहे.  बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत, असे उत्तर महापालिकेचे अधिकारी देत आहेत. लवकरच अनधिकृत व अतिक्रमण केलेल्या दुकानांवर कारवाई केली जाईल, असे अधिकार्‍यांचे अनेक महिन्यांपासून उत्तर ठरलेले आहे.  महामेट्रोचे अधिकारी सांगत आहेत की, चौकात दोन वॉर्डन नेमले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ते सहाय्य करीत आहेत. अशा तर्‍हेने सर्व विभाग आपापली जबाबदारी झटकून हात वर करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या मूळ प्रश्‍नाला बगल दिली जात आहे.